Tue, Jul 07, 2020 17:10होमपेज › Kolhapur › लॉकडाऊनमुळे ऑनलाईन स्पर्धांची धूम

लॉकडाऊनमुळे ऑनलाईन स्पर्धांची धूम

Last Updated: Apr 14 2020 12:36AM
कोल्हापूर : सागर यादव

लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. याला क्रीडाक्षेत्र अपवाद नाही. गेल्या सुमारे महिनाभरापासून सर्व स्पर्धा, शिबिरे, सराव बंद झाल्याने मैदान गाजविणारे खेळाडू घरातच बसून आहेत. यावर उपाय-योजना म्हणून ‘ऑनलाईन’ स्पर्धांचा पर्याय आवलंबला जात आहे. याशिवाय  नवोदित खेळाडूंना मार्गदर्शनासाठी ज्येष्ठ खेळाडू व प्रशिक्षकांकडून सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. 

जीवघेण्या कोरोनाच्या संकटाशी अवघे जग लढत आहे. अनेक देश लॉकडाऊन झाले आहेत. भारतात 22 एप्रिलचा ‘जनता कर्फ्यू’ आणि 23 एप्रिलपासून लॉकडाऊन करण्यात आला. पहिल्या टप्प्यातील 14 दिवसांचा लॉकडाऊन पूर्ण झाल्यानंतर दुसर्‍या टप्प्यातील लॉकडाऊन ‘किमान’ 30 मार्चपर्यंत घोषित करण्यात आला आहे. यामुळे इतर सर्वच क्षेत्रांप्रमाणेच क्रीडा क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे. जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. काही स्पर्धा पुढे ढकलल्या. खेळाडूंची सराव शिबिरे, उन्हाळी सुट्टीतील कॅम्प, अ‍ॅडव्हेंचर कॅम्प, विविध वर्ग थांबविण्यात आले आहेत. यामुळे सर्वच खेळाडूंना घरी बसण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे. 

लोक सोशल डिस्टन्सिंगबरोबर आरोग्याची पुरेपूर काळजी काटेकोरपणे घेत आहेत. तर हुल्लडबाज सर्व नियम धाब्यावर बसवून मनमौजीपणा करत आहेत. खेळाडूही कर्तव्य भावनेने या जागतिक संकटात आपआपल्या परीने योगदान देत आहेत. कोरोना विरुद्धच्या मोहिमेसाठी यथाशक्ती विविध प्रकारची मदत त्यांच्याकडून केली जात आहे. 

ऑनलाईन नेमबाजी स्पर्धा उद्या

लॉकडाऊनमध्येही खेळ अखंड सुरू राहावा यासाठी 15 एप्रिल रोजी ऑनलाईन नेमबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात जगभरातील सुमारे 50 स्पर्धक सहभागी होणार आहेत. सहभागी खेळाडू घरीच इलेक्ट्रिक टार्गेटवर ही स्पर्धा खेळतील. सर्व सहभागींची इलेक्ट्रिक टार्गेट मोबाईल व इंटरनेटच्या माध्यमातून जोडण्यात येणार असून 
संयोजक ऑनलाईन  पंचगिरी करून निर्णय देणार आहेत. खेळाप्रमाणेच निबंध, वक्तृत्व, सुंदर अक्षर, चित्रकला, संगीत अशा विविध स्पर्धांचे आयोजन छोट्या-छोट्या व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून केले जात आहे. 

कोल्हापुरात फुटबॉलच्या नियमांचे धडे

कोल्हापुरात यंदा लॉकडाऊनमुळे फुटबॉल हंगाम बंद पडला आहे. यामुळे यावर अवलंबून असणारे शेकडो संघ व खेळाडू घरीच बसून आहेत. अशा खेळाडूंना फुटबॉल संदर्भातील व्यायाम, वॉर्मअप, आहार याचबरोबर फुटबॉल संदर्भातील नियमांबाबत मार्गदर्शन केले जात आहे. सॉकर रेफ्री असोसिएशनतर्फे दररोज एका नियमाबाबत व्हॉटस् अ‍ॅपच्या माध्यमातून चर्चा केली जाते. ज्येष्ठ खेळाडू व पंच प्रदीप साळोखे मार्गदर्शन करत आहेत.