Thu, Sep 24, 2020 10:33होमपेज › Kolhapur › स्थानिक फुटबॉलपटूंनी शिस्त शिकण्यासाठी यायचे होते...

स्थानिक फुटबॉलपटूंनी शिस्त शिकण्यासाठी यायचे होते...

Published On: Dec 10 2017 1:19AM | Last Updated: Dec 09 2017 11:20PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : सागर यादव 

खिलाडूवृत्ती, वक्‍तशीरपणा, नियमांचे काटेकोर पालन, पंचांच्या निर्णयाचा आदर आणि उत्कृष्ट खेळ अशा गोष्टी शिकण्यासाठी का असेना स्थानिक फुटबॉलपटूंनी मैदानात येणे गरजेचे होते. किमान या गोष्टी शिकून त्यांना आपल्या खेळातील कमतरता दूर करता आल्या असत्या, अशी अपेक्षा नुकत्याच कोल्हापुरात झालेल्या इंडियन वुमेन्स लिग स्पर्धेच्या निमित्ताने फुटबॉलप्रेमीतून व्यक्‍त करण्यात आल्या. 

मुलांप्रमाणेच मुलींनाही फुटबॉल खेळात संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने केएसएचे प्रमुख शाहू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे (विफा) उपाध्यक्ष मालोजीराजे, खा. संभाजीराजे, सौ. संयोगिताराजे, ‘विफा’च्या महिला विभागाच्या अध्यक्षा मधुरिमाराजे यांच्या प्रयत्नांमुळे कोल्हापुरात गेल्या काही वर्षांपासून महिला फुटबॉल स्पर्धा सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे अल्पावधीत महिलांच्या फुटबॉल संघांची संख्या 12 ते 15 इतकी झाली आहे. भारत विरुद्ध हॉलंड सारख्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनीय महिला सामन्याचा थरारही कोल्हापूरच्या फुटबॉलशौकिनांना अनुभवायला मिळाला आहे. 

स्थानिक खेळाडू-समर्थकांनी फिरवली पाठ...

कोल्हापूरकरांच्या या यशस्वी वाटचालीची दखल घेऊनच ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन (एआयएफएफ) ने कोल्हापुरात ‘इंडियन वुमेन्स फुटबॉल लिग’ स्पर्धा आयोजनाची संधी दिली. यानुसार गेली 15 दिवस छत्रपती शाहू स्टेडियमवर महिला फुटबॉल स्पर्धेचा थरार रंगला. याचा लाभ महिला, ज्येष्ठ नागरिकांसह  बालचमू आणि शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनीही घेतला.

काही तालीम संस्था, फुटबॉल क्‍लबचे निवडक व नवोदित खेळाडू वगळता बहुतांशी खेळाडूंनी व त्यांच्या समर्थकांनी या स्पर्धेकडे पाठ फिरवली होती. तालीम-मंडळांच्या इमारती, परिसरातील बोर्डचे कठडे, रिकामी मैदाने, शाळा-महाविद्यालयांसमोर दुचाकीवर बसून त्यांनी वेळ घालविला. मात्र ते शाहू स्टेडियमकडे फिरकलेही नाहीत. त्यांच्याबरोबरच स्थानिक स्पर्धांवेळी मैदानात उगाचच दंगा, आरडाओरड, पंच व प्रतिस्पर्धी खेळाडूंना शिवीगाळ करून मैदानात हुल्लडबाजी करणारे तथाकथित समर्थकही फिरकताना दिसत नव्हते. 

शिस्त, खिलाडूवृत्तीसह उत्कृष्ट खेळ

इंडियन वुमेन्स लिग स्पर्धेतील देशभरातील विविध राज्यांतील 12 नामांकित संघांनी सहभाग नोंदविला. या संघादरम्यान 30 सामने झाले. प्रत्येक सामन्यावेळी खेळाडूंची शिस्त, खिलाडूवृत्ती, वक्‍तशीरपणा, नियमांचे काटेकोर पालन, पंचांच्या निर्णयाचा आदर आणि उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन झाले. खेळाडू, पंच, सामना निरीक्षक, स्पर्धाप्रमुख, संयोजन समित्या, वैद्यकीय व्यवस्था, हाऊसकिपिंग यासह संबंधित प्रत्येक घटकाची शिस्त आदर्श घेण्यासारखी होती.