Thu, Feb 27, 2020 22:28होमपेज › Kolhapur › सोयीच्या नात्याची सोयीस्कर सोय!

सोयीच्या नात्याची सोयीस्कर सोय!

Published On: Dec 11 2017 1:30AM | Last Updated: Dec 10 2017 11:39PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : पूनम देशमुख

‘लिव्ह इन रिलेशनशिप’ या विषयाबाबत आजही आपल्याकडे भुवया उंचावत प्रतिक्रिया दिल्या जातात. आपल्या संस्कृती, चालीरिती, नियम वेगळे... किती वेगाने बदलतंय सगळे, कोण रोखणार, काय होणार असे असंख्य प्रश्‍न आहेत. थोडक्यात लग्नाचा लाडू खावा की बर्फी.पाश्‍चात्त्य देशात चालणारे हे प्रकार असे म्हणताना आज आपल्याच शेजारी अनेकजण ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहताना दिसतात.

लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे लग्‍नाशिवाय सहजीवन ही फक्‍त पाश्‍चात्त्य जीवनसंस्कृती राहिलेली नसून हा सहजीवनाचा प्रकार आपल्या आसपास पहायला मिळत आहे. मेट्रो सिटीमधील करिअरिस्टिक व्यक्‍ती त्यांच्या क्षेत्रांत अत्युच्च शिखर गाठायचं असते, लग्नाची जबाबदारी नको, तर काहींच्या बाबतही असे नसेलही, पण तरीही कुटुंबासह  येणार्‍या जबाबदार्‍यांच ओझं नको असल्याने लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय अवलंबला जातो. 

आता फक्‍त तरुणाईच नव्हे तर वयोवृद्धही लिव्ह इनचा पर्याय अवलंबत असल्याचे समोर आले आहे. जीवनाची गरज म्हणून हा पर्याय निवडताना समाज याला मान्यता देत नाही तर दुसरीकडे समाजाची बंधने झुगारून तरुण पिढी स्वेच्छेने जीवन जगता यावे याकरिता लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत आहे. अनेकदा लग्‍नापूर्वी एखाद्या व्यक्‍तीबद्दल त्याच्या स्वभावाबद्दल आपल्या वेगळ्या कल्पना असतात, मात्र लग्‍न केल्यानंतर आपण कुठेतरी चुकलो आहे, याची जाणीव व्हायला लागते.

मग वेगळे होण्याचा सोयीस्कर पर्याय उरतो ही परिस्थिती ‘लिव्ह इन’मधील तरुणाईची आहे याउलट दुसरीकडे आयुष्यभर इतकी नाती, मित्रमंडळी जोडत आयुष्याच्या शेवटच्या वळणावर एकटेपणा जीवघेणा ठरतो. मुले - सुना नोकरी, संसारात मग्‍न तर नातवंडे त्यांच्या आयुष्यात गुंग असतात यावेळी दिवसभर घरात एकटेपणा नकोसा वाटतो. अशावेळी जोडीदाराची उणीव अधिक भासू लागते. याच विचारातून आता वयोवृद्धही ‘लिव्ह इन’मध्ये राहत आहेत. सारासार विचार करता लिव्ह इन रिलेशन नात्यांना कोणत्याच बंधनात बांधून ठेवत नाही. मात्र, तरीही एकमेकांबद्दली आत्मीयता, प्रेम, काळजी लग्‍न झालेल्या जोडीदारासारखीच असते.

एकटेपणा घालवण्यासाठी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चा पर्याय

लिव्ह इन रिलेशनशिप नैतिकदृष्ट्या योग्य की अयोग्य हे प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. त्याबाबत वाद - विवाद होऊ शकतात. पण सध्या लग्न व त्यानंतरच्या जबाबदार्‍या टाळण्यासाठी असेल किं वा म्हातारपणीचा एकटेपणा घालवण्यासाठी अनेकजण ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चा पर्याय स्वीकारत आहेत. नात्यामध्ये समजूतदारपणा असेल तर अशी नाती टिकतात किंवा अनेकदा पोलिस ठाणे आणि कोर्टाच्याही पायर्‍या चढतात.