होमपेज › Kolhapur › लाईफ स्टाईलची बातच न्यारी, खरेदीची हौस भारी

लाईफ स्टाईलची बातच न्यारी, खरेदीची हौस भारी

Last Updated: Jan 12 2020 12:46PM

संग्रहित छायाचित्रअभ्युदय रेळेकर 

काळ बदलला, दिवस बदलले, जग बदलले. या बदलामंध्ये संस्कृतीचे मनोहारी मिश्रण झाले. लोकांनी आपल्या बदल त्या आवडीनिवडीनुसार जीवनशैली बदलली. दागिने, कपडेलत्ते, खाण्यापिण्यचे पदार्थ, प्रवास इत्यादी क्षेत्रांतील आवडी बदलत गेल्या; इतकेच काय, पण पूर्वी मिळणारी साधी पानाची पट्टी बदलून पानातही शेकडो प्रकार आले. इतक्या सार्‍या बदलत्या जीवनशैलीचा वेध घेणारी ही पुरवणी.

आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण एवढा गुरफटून गेला आहे की कधीकधी असं वाटतं आपण जगणंच हरवून बसलो आहे. अशावेळी अनेकदा आपल्याला डिप्रेशन आलेलंही कळत नाही. मग आपण त्यावरचे उपाय शोधू लागतो. कधीतरी सुट्टीच्या दिवशी वेळ मिळाला की कुठेतरी फिरायला जायचा बेत नक्‍की होतो. जवळपासची रम्य स्थळे आपण पाहायला जातो. कधीतरी बाहेर हॉटेलमध्ये जेवणाचा मस्तपैकी बेत करण्यात येतो. हल्ली वेगवेगळ्या वैशिष्ट्याने परिपूर्ण अशी खवय्यांची तृष्णा शांत करणारी हॉटेल जागोजागी आपल्याला पाहायला मिळतात. त्यातून क्षुधाशांती तर होतेच. त्याचबरोबर वेगवेगळ्या नावीन्यपूर्ण जिभेचे चोचले पुरवणार्‍या चवींचीही चटक लागते. मग महिन्यातून कधी-कधी एकदा तर काहीवेळा दोन तीनदा अशा भोजनाचा आनंद आपण घ्यायला सुरुवात करतो.

काही दिवस झाले की आपण या सगळ्यालाही हळूहळू कंटाळायला लागतो. लाईफमध्ये तोच-तोचपणा आल्याची भावना आपल्यात निर्माण होते. कारण सगळ्या हॉटेलचा आस्वाद आपण घेतलेला असतो. जवळपासची सगळीच सौंदर्यस्थळे आणि पिकनीक स्पॉट आपण पाहिलेले असतात. मग आता करायचे तरी काय असा प्रश्‍न आपल्याला पडू लागतो. जीवन पुन्हा नीरस बोअर वाटायला लागते. पुन्हा आपण आपली लाईफस्टाईल हटके प्रफुल्लित करण्यासाठी नवीन काय करता येईल याचा विचार करायला सुरुवात करतो. यात काहीही वावगे नाही किंवा वेगळे काहीच नाही. ही तर मानवी वृत्ती-प्रवृत्ती आहे. सतत नावीन्याच्या शोधात राहिल्यानेच आपले जीवन प्रवाही आणि समृद्ध होत असते.

अलीकडच्या काळात आपण खूपच टेक्नोसॅव्ही होताना दिसतो. प्रत्येकाच्या हातात काहीतरी गॅझेट हे पाहायला मिळतेच. स्मार्टफोन तर कधीच लग्झरीच्या कॅटॅगरीतून इसेन्शियलच्या वर्गात येऊन बसलेला आहे. त्याच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे हेडफोन्स आलेत. वायरलेस ब्लूटुथ हेडफोनची आता चलती आहे. या स्मार्टफोनच्या युगात आपल्या मुलांचे बालपण आणि तरुणपण हरवत तर नाही ना याची चिंता पालकांना नेहमीच लागून राहिलेली असते. त्यातून पालक आता मुलांच्याकडे जास्त लक्ष देताना दिसतात. मुलांच्यासाठी कसा वेळ देता येईल याचा प्रयत्न आता प्रत्येक पालक करताना दिसतो. मोबाईलच्या जगातून थोडेसे दूर जात जवळपासच्या अम्युझमेंट पार्कमध्ये एक दिवसाच्या आऊटिंगचा ट्रेंड चांगलाच रुजत चालला आहे. मुलांच्याबरोबर या पार्कमध्ये विविध राईडस्चा आनंद घेताना त्यांच्याबरोबरचा पालकत्वाचा रॅपोही चांगला होताना दिसत आहे.

आरोग्याची काळजी आणि मानसिक समाधानासाठी वेळ देणे ही आजच्या काळात खूपच महत्त्वाची गोष्ट ठरत आहे. त्याद‍ृष्टीने मॉर्निंग वॉकपासून रात्री जेवणानंतर शतपाऊली, आकाशदर्शनाची मेजवानी घेण्याकडे हल्ली कल वाढत आहे. नवीन वर्षाची सुरुवात झाली की बहुतांश लोकांचा एक संकल्प असतोच असतो, तो म्हणजे जिम जॉईन करायचे, व्यायाम करायचा, मॉर्निंग वॉकला नियमितपणे जायचे... मात्र हा संकल्प एक तर सुरूच होत नाही किंवा सुरू झाला तरी तो एखाद-दुसरा आठवडा टिकतो. पुन्हा पहिले पाढे पंचावन्‍न अशीच या संकल्पाची अवस्था होते. मात्र, हल्ली यात मोठीच सुधारणा होताना दिसत आहे.

सुसज्ज जिमची सुविधा आता बहुतांश ठिकाणी झाल्याचे पाहायला मिळते. तिथे तज्ज्ञ प्रशिक्षकही असतात. एवढेच नाही तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या आरोग्याच्या टिप्स आणि संपूर्ण सूचना दिल्या जातात. आहार काय असावा. कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी याचा मंत्र व्यक्‍तीनुसार प्रत्येकाला देण्यात येतो. त्यामुळे व्यायाम आणि त्यातील सातत्य बहुतांशाने टिकताना दिसते. त्याबद्दलची जागरुकता सर्वांच्यातच आलेली पाहायला मिळत आहे. अगदी खेडोपाड्यातही आता जिमची संकल्पना रुजलेली पाहायला मिळते. शहरात तर अत्यंत अत्याधुनिक सोयींनीयुक्‍त जिम पाहायला मिळतात. त्यांचा लाभ घेताना युवक-युवतींच्याबरोबरच वाढलेला पोटाचा घेर कमी करण्यासाठी वयस्कही दिसतात.

आरोग्याबरोबरच विषय येतो तो सौंदर्याचा. तसे पाहिले तर सौंदर्याची व्याख्या ही व्यक्‍तिसापेक्ष असते, असे म्हणतात. जगाचा विचार केला तर जपान-चीनपासून रशिया, आशिया, मध्यपूर्व, आफ्रिका, युरोप ते अमेरिकेपर्यंत सौंदर्याचे मापदंड एवढे भिन्‍न-भिन्‍न आहेत की कुणाची कुणाशी तुलनाच होऊ शकत नाही. केवळ भारतीय उपखंडाचा विचार केला तरी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि पूर्वोत्तर भारतातील राज्यांपासून पश्‍चिम टोकाच्या गुजरात-राजस्थानपर्यंत सौंदर्याची व्याख्या भाषेप्रमाणेच दर बारा कोसावर बदलते असे म्हटले तर अतिशयोक्‍ती होणार नाही. परंतु या सगळ्यांच्यामध्ये एक कॉमन धागा सांगायचा झाला तर त्वचा आणि केसांचे सौंदर्य जपण्याचा प्रयत्न सर्वकालिक आणि सार्वत्रिक दिसतो. त्यासाठी विविध प्रकारची सौंदर्य प्रसाधने शाम्पू, तेल, क्रिम वापरण्यात नुसत्या महिलाच आघाडीवर नसतात तर यामध्ये पुरुषही काही कमी नाहीत असेच दिसून येते.

फिगर मेंटेन करतानाच, ती प्लेझंटही वाटली पाहिजे याचा विचार आता प्रत्येक स्त्रीपुरुष करताना दिसतो. त्यासाठी अत्यंत लाईट मेक-अप पासून हेवी कोटिंगपर्यंत सगळ्याच सौंदर्य प्रसाधनांचा योग्य तो आणि योग्य प्रकारे वापर करण्याकडे सर्वांचाच कल दिसतो. बाजारात वेगवेगळ्या प्रकारची सौंदर्यप्रसाधनेही स्त्री-पुरुषांच्यासाठी उपलब्ध आहेत. पूर्वी बाहेर पडताना महिला आणि मुलींना स्नो-पावडर पुरेशी असायची. आता यामध्ये नाना प्रकारच्या सौंदर्यप्रसाधनांची भर पडली आहे.

लिपस्टीक आणि मस्कारा लावल्याशिवाय काही जणींना तर साधा मेक-अप पूर्ण झाल्यासारखंच वाटत नाही. पावडर, स्नो आणि रुज मागे पडून आता मॅचिंग आणि ऑकेजनल फाऊंडेशनची रेंज बाजारात मिळताना दिसते. विविध शेड्स आणि टेक्स्चरच्या लिपस्टीकची तर भरमारच दिसून येते. महिला वर्ग त्यांच्या आवडी-निवडीनुसार त्याचा यथायोग्य वापर करतातच. घरच्या घरी मेक-अप करण्याबरोबरच रेग्युलर स्पा आणि स्पेशलाईज्ड स्पामध्ये जाऊन नियमितपणे सौंदर्याची निगा राखणारी पिढीच आता निर्माण होत आहे. सौंदर्याच्या द‍ृष्टीने कॉशस असणारे तरुणही काही कमी नाहीत. त्यांच्यासाठीही मेन्स स्पेशल पावडर-क्रिम पासून फेसवॉश आणि इतरही अनेक सौंदर्य प्रसाधने बाजारात दिसतात. स्त्री पुरुषांना सौंदर्य आणि देखणेपणा खुलवण्यासाठी ही सौंदर्य प्रसाधने सदैव तत्पर असतात.

नवनवीन गाड्यांच्याबरोबरच गृहसजावटीकडेही लोकांचे आता चांगलेच लक्ष असते. आमच्या आबा, आज्यापासून आमच्याकडे हा कोच-सोफासेट आहे. असे अभिमानाने सांगण्याचा जमाना आता झपाट्याने मागे पडत चालला आहे. जसा वर्षा-दोन वर्षाने घराचा रंग बदलला जातो, तसेच फर्निचर बदलण्याचा ट्रेंडही जोरदार असल्याचे दिसते. नेहमीच्या ठोकळेबाज फर्निचरला बगल देत नावीन्यपूर्ण कलात्मक विविध सुविधांनीयुक्‍त फर्निचर आता सर्वत्र मिळत असल्याने लोक गृहसजावटीमध्ये नियमितपणे नावीन्य आणताना दिसतात.

केनच्या फर्निचरचा कंटाळा आला की ते लॉनवर टाकून घरात स्टील आणि ब्रँडेड महागड्या फर्निचरने घर सजवले जाते. साध्या खुर्च्याही एवढ्या वैविध्यपूर्ण मिळत आहेत की प्रत्येकजण आपल्या चॉईसप्रमाणे तसेच गरजेनुसार फर्निचर घेताना दिसतात. फर्निचरच्या दुकानांमध्ये साध्या माफक दरातील प्लास्टिक फर्निचरबरोबरच अत्यंत उच्च दर्जाच्या मटेरियलपासून तयार केलेले कलात्मक, उंची दर्जाचे फर्निचरही उपलब्ध असल्याचे पाहायला मिळते. शहरांच्या ठिकाणी तर अनेकदा फर्निचर मॉलही पाहायला मिळतात. त्यामध्ये अगदी अँटिक फर्निचरपासून अत्याधुनिक यंत्रणा आणि सुविधा तसेच रंगसंगती असलेले फर्निचर मिळत असल्याने घराचे आकारमान, गरजा पाहून फर्निचरला पसंती दिली जाते.

काही कालावधीनंतर त्यामध्ये बदलही केला जातो. गाड्यांच्या प्रमाणे आता जुने फर्निचर देऊन नवीन घेण्याची सोयही काही ठिकाणी दुकानदार करत असल्याचे दिसते. नवनवीन ट्रेंडस् फॉलो करणारे दर्दी ग्राहक तसेच नियमित ग्राहकांची वर्दळ अशा दुकानांमधून नेहमीच पाहायला मिळते.नव्या वर्षाची नवीन सुरुवात काहीतरी नवीन खरेदीने करण्याची सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी बाजार सज्ज आहेच. त्यामुळे सर्वांनाचा खरेदीच्या शुभेच्छा..!