Sat, Feb 29, 2020 00:00होमपेज › Kolhapur › जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करूया

जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करूया

Last Updated: Jan 07 2020 12:45AM

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री सतेज पाटील आणि राजेंद्र पाटील- यड्रावकर यांचा खा. संजय मंडलिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.कोल्हापूर : प्रतिनिधी 

जिल्हा बँकेनेच मला राजकीय ओळख दिली. बँक ही माझी राजकीय जननी आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्हा बँकेची आथिर्र्क स्थिती सुधारण्यासाठी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवत जाणीवपूर्वक प्रयत्न केले. राजकीय पादत्राणे बँकेच्या बाहेरच ठेवली. त्यामुळेच बँक आर्थिक अडचणीतून बाहेर पडली. आज बँक देशात पहिल्या क्रमांकावर पोहोचली. त्यामुळेच बँकेची येणारी पंचवार्षिक निवडणूक सर्वांनी मिळून बिनविरोध करूया, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केले.

शाहूपुरीतील मुख्य शाखेत  जिल्हा  बँकेतर्फे ना. मुश्रीफ, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा सत्कार खा. संजय मंडलिक यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांची प्रतिमा, शाल आणि श्रीफळ देऊन करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. शेतकर्‍यांची आर्थिक अस्मिता असलेली बँक टिकली पाहिजे, अशीच वाढली पाहिजे, असा निर्धार यावेळी तिन्ही मंत्र्यांनी केला.  बँकेचे संचालक आ. राजूबाबा आवळे, आ. राजेश पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. 

मंत्री मुश्रीफ म्हणाले, गेली 40 वर्षे सहकाराशी मी निगडित आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातूनच शेतकर्‍यांसोबत माझी ओळख अधिक द‍ृढ झाली. आसुर्ले-पोर्लेच्या दत्त साखर कारखान्यामुळे बँक अडचणीत आली. आर्थिक निर्बंधांमुळे लायसेन्स राहते की नाही, असा प्रश्‍न होता. त्यानंतर बँकेत निवडून आलेल्या संचालक मंडळाने माझ्यावर पूर्णपणे विश्‍वास ठेवला. कोणाचाही मुलाहिजा न बाळगता वसुलीला प्राधान्य दिले. थकबाकीदारांनीही साथ दिली. राजकारणामुळे जिल्ह्यातील एकाही संस्थेची कधी अडवणूक केली नाही. सर्वांच्या प्रयत्नांचे फळ म्हणून गेल्या दोन वर्षांत बँक देशात क्रमांक एकवर आली. आता पाच हजार कोटी रुपयांच्या ठेवी असून, त्या सहा हजार कोटींवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. डिव्हिडंड आणि बोनस 12 टक्के देण्याचा मानस आहे. 

पूरग्रस्त शेतकर्‍यांचे पैसे खात्यावर जमा होण्यास सरुवात होईल. पूरबाधित घरांच्या नुकसानीचे पैसेही मिळणार आहेत. कर्जमाफी योजनेत काही त्रुटी असू शकतात. दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच  किती कर्ज आणि शेतकरी वंचित राहिले, याचा नेमका आकडा पुढे येईल. त्यामुळे गटसचिव संघटनेने कुलूप बंद आंदोलन मागे घ्यावे, असे मुश्रीफ म्हणाले.

राज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, दहा वर्षे बँकेचा संचालक म्हणून कार्य केल्यानंतर ग्रामीण भागाचे अर्थकारण कळले. सहकारामुळेच मी समाजकारण आणि राजकारणात आलो. शेतकर्‍यांची आर्थिक वाहिनी असलेली जिल्हा बँक मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली ऊर्जीतावस्थेत पोहोचली. हे दुधाचे भांडे मुश्रीफ यांनी जपले. ज्यांची कर्ज परत करण्याची क्षमता आहे, अशाच संस्थांना मुश्रीफ यांनी कर्ज दिले. प्रसंगी आमच्यापैकी अनेकांना त्यांनी नाही म्हणून सांगितले. जे काही नियमात नाही ते नाही म्हणण्याची धमक त्यांच्यात आहे. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या लढ्यात आम्ही तिघेही न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू.

मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, पक्ष आणि गटविरहित, असे मुश्रीफ यांनी बँकेचे कामकाज केले. मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे काम करू. शिरोळ तालुक्यासह जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करू.  वस्त्रोद्योग  विभागास शासनाची मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.  

खा. संजय मंडलिक म्हणाले, बँकेचा परवाना राहणार की नाही, अशी नाजूक स्थिती असताना मुश्रीफ यांनी बँकेची धुरा खांद्यावर घेतली. कडक आचारसंहिता लावत बँकेची प्रगती केली. आता ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून ते ग्रामीण भागाचा चेहरा-मोहरा बदलतील. सतेज पाटील यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासह महिलांवरील अत्याचार रोखण्यास ठोस उपाय योजावेत. यड्रावकर यांनी कोल्हापूरची कलानगरी ही ओळख नव्याने निर्माण व्हावी, चित्रनगरीसह अनेक प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी सांस्कृतिक खात्याचा मंत्री म्हणून प्रयत्न करावेत.  माजी खा. नवोदिता माने, आ. राजेश पाटील, आ. राजूबाबा आवळे यांनी मनोगत व्यक्‍त केले. प्रास्ताविक संचालक भय्या माने यांनी केले. आभार बाबासाहेब पाटील यांनी मानले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, माजी आ. संध्यादेवी कुपेकर, उदयानी साळुंखे, पी. जी. शिंदे, आर. के. पोवार आदींसह बँकेचे संचालक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नेत्यांनी दिली मदतीची कबुली

जिल्हा बँकेत सध्या सहा आमदार आहेत. निवडणुकीपूर्वी आमच्या संचालक मंडळात ठरले होते. आमच्या पैकी कोणीही निवडणुकीला उभे राहू देत, आपण सर्वजण बँक म्हणून मदत करायची, असे खा. संजय मंडलिक, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आ. राजेश पाटील यांनी भाषणात सांगितले. पक्षीय परिघाबाहेर नेत्यांनी एकमेकाला मदत केल्याची कबुली दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणाबाबत पडद्यामागे घडलेल्या घडामोडींची उपस्थितांमध्ये चर्चा सुरू होती.

आमचाही वाटा द्या : पाटील

सतेज पाटील म्हणाले, मुश्रीफ मंत्री होणार हे माहिती होतेच, फक्‍त खाते कोणते मिळणार याची उत्सुकता होती. आता ग्रामविकास खात्यामुळे मंत्री मुश्रीफ ग्रामीण भागाचा कायापालट करतील. मलाही 14 वर्षे आमदारकी आणि चार वर्षे मंत्रिपदाच्या अनुभवाचे फळ म्हणून पुन्हा संधी मिळाली. जिल्ह्यातून 10 रुपये राज्य शासनाच्या तिजोरीत गेले, तर त्यातून 50 रुपये परत आणण्याची किमया मुश्रीफ करू शकतात. हा निधी आणताना आम्हालाही निधी द्या. आमचाही वाटा या निधीत असू द्या.

मुश्रीफ करणार मोदींचे वाक्य खरे

मंत्री मुश्रीफ म्हणाले, आतापर्यंत जिल्ह्यात सर्वांची मुस्कटदाबी सुरू होती. आंदोलन करण्यास अलिखित बंदी होती. एक प्रकारचे हुकूमशाही वातावरण होते. मात्र, आता लोकांत आमचं सरकार असल्याची भावना आहे. गेल्या तीन दिवसांपासून आमच्यावर होत असलेला लोकांकडून शुभेच्छांचा वर्षाव हेच सांगतो. महिन्यातून एकदा घेणार्‍या जनता दरबारात लोकांची कामे मार्गी लागतील. चिरीमिरीसाठी कामे तटणार नाहीत. ‘मैं  नहीं खाऊंगा...और किसीको खाने भी नहीं दुंगा...’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाक्य मी खरे करणार आहे.