Sun, Sep 27, 2020 00:38होमपेज › Kolhapur › महाविकास आघाडी नेत्यांना अध्यक्षपदाचा प्रस्ताव देणार

महाविकास आघाडी नेत्यांना अध्यक्षपदाचा प्रस्ताव देणार

Last Updated: Dec 27 2019 2:22AM
कोल्हापूर : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद शिवसेनेला मिळावे, असा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या नेत्यांना देण्याचा निर्णय शिवसेना नेत्यांच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. यासंदर्भात अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा असेल, अशी माहिती संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी पत्रकारांना दिली. जिल्हा परिषदेतील सत्ता शिवसेनेवर अवलंबून असल्याने यावेळी सत्तांतर होणार, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेना नेत्यांच्या झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीसोबत जाण्यास काही नेत्यांनी विरोध केल्याचे समजते.

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसंदर्भात सर्व पक्षांच्या बैठका सुरू आहेत. गुरुवारी दुपारी शिवसेना नेत्यांची बैठक शासकीय विश्रामधाममध्ये झाली.  बैठकीस संपर्कप्रमुख दुधवडकर यांच्यासह खा. संजय मंडलिक,  आ. प्रकाश आबिटकर, माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर, चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील-सरुडकर, उल्हास पाटील, जिल्हा प्रमुख संजय पवार, अजित नरके आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेत सध्या कोणालाच स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे आघाड्यांना सोबत घेऊन भाजपने सत्ता स्थापन केली आहे. शिवसेनेचे 10 सदस्य आहेत. त्यापैकी 7 सदस्य भाजपसोबत आहेत तर तीन सदस्य काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत आहेत. जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेमध्ये शिवसेनेकडे निर्णायक सदस्य संख्या असल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत शिवसेनेला अतिशय महत्त्व आले आहे. गेल्यावेळी शिवसेनेचे 7 सदस्य भाजपसोबत राहिल्याने त्यांना उपाध्यक्ष व एक सभापतिपद देण्यात आले. राज्यातील राजकारणाची समीकरणे बदलली आहेत. भाजप व शिवसेना यांची महायुती तुटल्याने भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषेदच्या राजकारणातही याच प्रकारे महाविकास आघाडी अस्तित्वात आणण्याचे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र स्थानिक राजकारणामुळे यात अडचणी आहेत. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

दुपारी दीडच्या सुमारास शिवसेनेचे सर्व नेते शासकीय विश्रामधाम येथे आले. संपर्क प्रमुख दुधवडकर यांनी प्रथम सर्व नेत्यांची मते ऐकून घेतली. यावेळी बहुतांशी नेत्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी शिवसेनेची लढत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरुद्ध झाली आहे. जिल्ह्यातील कोणताही विधानसभा मतदारसंघ घ्या, कमी-अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती राहिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी करताना स्थानिक राजकारणाचा विचार होणे आवश्यक आहे. शिवसेनेमुळे जर कोणाची सत्ता येणार असेल तर शिवसेनेला अध्यक्षपद मिळाले पाहिजे, असे मत व्यक्‍त केल्याचे समजते. सर्वांची मते ऐकून घेतल्यानंतर प्रथम महाविकास आघाडीच्या नेत्यांशी संपर्क साधून अध्यक्षपदाचा प्रस्ताव देण्याचा निर्णय या बैठकीत झाला. बैठक संपल्यानंतर दुधवडकर यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती पत्रकारांना दिली.

ते म्हणाले, जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीबाबत आमची प्राथमिक चर्चा झाली. यावेळच्या जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीत एकसंध राहण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. राज्यात ज्याप्रमाणे आघाडी झाली आहे, तशीच आघाडी जिल्हा परिषदेत करण्याबाबतही चर्चा झाली.  गेल्यावेळी काही भाजपकडे, काही काँग्रेसकडे असे झाले होते. मात्र यावेळी तसे काही होणार नाही. यासंदर्भात आम्ही शिवसेनच्या जिल्हा परिषद सदस्यांची मतेही ऐकून घेणार आहोत. त्यानंतर व्हिप काढण्यात येईल.

पंचायत समितीलाही अशीच आघाडी करा : नरके
माजी आ. चंद्रदीप नरके म्हणाले, महाविकास आघाडी करावयाची झाल्यास केवळ जिल्हा परिषदेपुरती नको. ती पंचायत समिती, ग्रामपंचायती यामध्येही झाली पाहिजे. शिवसेनेशिवाय कोणाचाही अध्यक्ष होऊ शकत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेत शिवसेनेचा अध्यक्ष करावा आणि एक सभापतिपद द्यावे, अशी आम्ही मागणी केली आहे. राज्यात महाविकास आघाडी झाली आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपदे मिळाली आहेत. तीच भूमिका काँग्रेस व राष्ट्रवादीने सर्वत्र स्वीकारावी. अध्यक्ष निवडीपूर्वी पंचायत समिती सभापती निवडी होणार आहेत. अनेक पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे सदस्य निवडून आले आहेत. करवीर पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे चार सदस्य आहेत. याठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे. याठिकाणी त्यांनी शिवसेनेला उपसभापतिपद देण्याची भूमिका घेतली पाहिजे. महाविकास आघाडीचे राज्यात वातावरण चांगले ठेवण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने ज्या ठिकाणी त्यांच्या सत्ता आहेत, त्याठिकाणी शिवसेनेला सामावून घ्यावी, हीच भूमिका आपण आजच्या बैठकीत मांडली.

केवळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेचा पाठिंबा कोणाला हवा असेल तर तो आम्ही मोकळा पाठिंबा देणार नाही. आमचा  वापर करून घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये, ही भूमिका आम्ही बैठकीत मांडल्याचे नरके यांनी सांगितले.

प्रस्तावावर दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची आज बैठक
शिवसेना नेत्यांनी अध्यक्षपदाचा प्रस्ताव बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना सादर केला आहे. यावर शुक्रवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होईल. या बैठकीत शिवसेनेच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येईल, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी सांगितले.

महाडिक, चंद्रकांत पाटलांना ताकद दाखवू 
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील व महाडिक यांना शिवसेनेची ताकद दाखवून देऊ, असे दुधवडकर यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना दिले.

 "