Thu, Jul 16, 2020 00:06होमपेज › Kolhapur › प्राथमिक शिक्षक बदल्यामध्ये पारदर्शकतेचा अभाव!

प्राथमिक शिक्षक बदल्यामध्ये पारदर्शकतेचा अभाव!

Published On: May 22 2018 1:25AM | Last Updated: May 22 2018 12:09AMसुळकूड : एम. वाय. भिकाप्पा पाटील

27 फेब्रुवारी 2017 च्या शासन परिपत्रकानुसार यावर्षी ऑनलॉईन पोर्टलद्वारे प्रथमच होत असलेल्या प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याने राज्यभर शिक्षणक्षेत्रात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. 

प्रशासनाने संवर्गनिहाय व तालुकानिहाय प्रत्येक टप्प्यावर झालेल्या बदल्यांच्या याद्याच प्रसिद्ध न केल्याने शिक्षकांना आपल्या पसंतीच्या 20 शाळांचा सेवाज्येष्ठतेनुसार योग्य पसंतीक्रम देता आला नाही. त्यामुळे या बदली प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. परिणामी संबंधित शिक्षकांनी बदलीतील अनियमिततेबाबत व्यक्‍तिगत तक्रारी पंचायत समिती, शिक्षण विभागामार्फत जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे पाठवित न्यायालयात जाण्याची परवानगी मागितली आहे. संपूर्ण राज्यात सर्वात मोठ्या प्रमाणात असणारा कर्मचारी वर्ग म्हणजे प्राथमिक शिक्षक. त्यांच्या जिल्हांतर्गत  बदल्यांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाने 27 फेब्रुवारी 2017 रोजीच्या परिपत्रकानुसार सुधारित धोरण निश्‍चित केले, त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यातील शाळांची सुगम व दुर्गम या दोन प्रकारात विभागणी करण्यात आली. 

तर शिक्षकवर्गामध्येही संवर्ग 1 व 2 आणि बदली अधिकार प्राप्‍त व बदली पात्र अशा चार विभागांत विभागणी केली. विशेष संवर्ग 1 च्या शिक्षकांमध्ये प्रामुख्याने कॅन्सर, पक्षाघात, अपंग, कुमारिका, विधवा, परित्यक्‍ता व 53 वर्षांवरील शिक्षक आजी व माजी सैनिकांच्या पत्नी यांचा समावेश करण्यात आला. विशेष संवर्ग भाग-2 शिक्षकांमध्ये पती-पत्नी एकत्रिकीकरण या सदराखाली एकमेकांपासून जि.प. राज्य शासकीय, केंद्रशासकीय मान्यताप्राप्‍त शासकीय संस्था येथील शिक्षकांचा समावेश केला. बदली अधिकारप्राप्‍त शिक्षक म्हणून दुर्गम भागात 3 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेले शिक्षक आणि बदलीप्राप्‍त शिक्षक म्हणून सुगम भागात 10 वर्षांपेक्षा अधिक सेवा केलेले शिक्षक आणि 30 कि.मी.च्या आत असलेले पती-पत्नी यांचा समावेश करण्यात आला. 

बदली प्रक्रिया राबविण्यासाठी एन.आय.सी. पुणे यांनी ऑनलाईन पोर्टलची निर्मिती केली. या पोर्टलमुळे बदली प्रक्रियेत मानवी हस्तक्षेपाला कोणताही वाव असणार नाही. त्यामुळे राजकीय वशिलेबाजी व अर्थपूर्ण घडामोडींना वाव मिळणार नाही. साहजिकच शिक्षकांच्या बदल्या त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार न त्यांनी पोर्टलला भरलेल्या 20 शाळांमधील पसंतीक्रमानुसार व सर्व बदल्या पारदर्शी होतील, असे सूचित केले; परंतु 2017-18 च्या शैक्षणिक वर्षात 27 फेब्रुवारी परिपत्रकातील बदली विषयक तरतुदी विरोधात अनेक शिक्षक संघटनांनी मा. उच्च न्यायालयाची याचिका दाखल केल्यामुळे बदली प्रक्रिया दुसर्‍या शैक्षणिक, सत्रापर्यंत रखडली. अंतिमत: शासनाने ही प्रक्रिया थांबवून सन 2018-19 ला राबविणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार जानेवारी 2018 पासून बदली प्रक्रिया सुरू करण्यात आली व जिल्ह्यातील 3672 शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या 18 मे 2018 रोजी करण्यात आल्या. बदलीने नियुक्‍ती झालेल्या शाळेत त्वरित हजर होण्याचे आदेश देण्यात आले.

शिक्षकवर्गाने बदली प्रक्रियेबाबत घेतलेले आक्षेप पुढीलप्रमाणे...

1)बदली टप्प्यानुसार समानीकरणाअंती रिक्‍त जागा घोषित झाल्या नाहीत.
2)टप्पा क्र. 1 ते 4 नुसार बदली प्रक्रिया न राबविता सर्व टप्प्यांच्या बदल्या एकाचवेळी करण्यात आल्या.
3)प्रशासकीय बदली होऊनही विनंती बदलीचे आदेश 
4)30 कि.मी.च्या आतील काही पती-पत्नी शिक्षकांची सोय करण्यात आलेली नाही.
5)आदेशांचे वाटप करताना कागदपत्रे योग्य प्रकारे न तपासल्याने काही चुकीचे आदेश वितरित करण्यात आले.
6)बदली प्रक्रियेत अनियमितता होऊन ज्येष्ठ शिक्षकांऐवजी कनिष्ठ शिक्षकांना सोयीच्या शाळेत बदली मिळाली. 
7)पदवीधर शिक्षक व विषय शिक्षक यांच्या नेमणुकीत अनियमिततेचे प्रकार.