Sat, Feb 29, 2020 13:09होमपेज › Kolhapur › कोल्हापूर शहर उजळणार एलईडीने

कोल्हापूर शहर उजळणार एलईडीने

Published On: Aug 21 2018 1:36AM | Last Updated: Aug 21 2018 12:16AMकोल्हापूर ः सतीश सरीकर 

कोल्हापूर नगरपालिका अस्तित्वात आली, त्यावेळी गावात अखंड रस्त्यावर कुठेतरी एखादा बल्ब चमचमायचा... नंतर पांढर्‍या ट्यूब आल्या... मग हळूहळू सोडियम वेपरचे दिवे, मेटल अलाईड बसविण्यात आले... तर काही वर्षांपूर्वीपर्यंत हॅलोजनचा वापर सर्रास होत होता... परंतु आता तंत्रज्ञान त्याच्याही पुढे गेले असून, एलईडीचा जमाना आला आहे... काळानुसार बदलत गेलेल्या कोल्हापूर शहरातही आता तब्बल 20 हजार 580 एलईडी पथदिवे बसविण्यात येणार आहेत... त्यामुळे महापालिकेची वर्षाला तब्बल चार कोटी रुपयांची बचत होणार आहे.

राज्य शासनाने करार केलेल्या एका कंपनीसोबत महापालिका प्रशासनाचा करार होणार आहे. येत्या महासभेत त्यावर शिक्‍कामोर्तब होईल. त्यानंतर संबंधित कंपनी एक महिना संपूर्ण शहरात सर्वेक्षण करून कोणत्या रस्त्यावर किती ठिकाणी आणि किती वॅटचे एलईडी बसवावेत याचा अहवाल तयार करणार आहे. डिसेंबरपर्यंत संपूर्ण शहर एलईडीने उजळणार आहे. सात वर्षे संबंधित कंपनीकडेच मेंटेनन्स राहणार आहे. तब्बल 12 कोटी 76 लाखांचा हा प्रोजेक्ट आहे. महापालिका निधीतून यापूर्वी बसविण्यात आलेले एलईडी दिवे वगळून इतरत्र लावण्यात येणार आहेत. 

राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाच्या ऊर्जासंवर्धन धोरण 2017 नुसार सर्व नागरी स्वराज संस्थांना पथदिवे बसविताना एलईडी पथदिवे बसविणे बंधनकारक केले आहे. त्या अनुषंगाने सर्व नागरी स्थानिक स्वराज संस्थांच्या क्षेत्रात केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रम असलेल्या एका कंपनीबरोबर एस्को तत्त्वावर एलईडी पथदिवे बसविण्यासाठी राज्य शासनाने करार केला आहे. त्यांच्यासमवेत संबंधित नागरी स्थानिक स्वराज संस्थेने त्यांच्या क्षेत्रात एलईडी पथदिवे बसविण्यासाठी करावयाचा कराराचा मसुदाही विहित केला आहे. संबंधित कंपनीसोबत करार करणे महाराष्ट्र शासनाने 4 जून 2018 च्या शासन निर्णयानुसार बंधनकारक केले आहे. त्यानुसार करार केल्यास संपूर्ण शहरात असणारे ट्यूबलाईट, सोडियम दिवे, मेटल हलाईड दिवे बदलून त्याजागी नॅशनल लायटिंग कोडप्रमाणे एलईडी बसविण्यात येणार आहेत. तसेच त्या एलईडीची सी.सी.एम.एस.द्वारे देखभाल होणार आहे. 

पथदिव्यासाठी एलईडी दिवे बसविण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजना किंवा अन्य योजनेतून राज्य शासनाने निधी मंजूर केला असेल, तर मात्र 12 जानेवारी 2018 पर्यंत कार्यादेश देण्यात आले नसतील अशा निधीतून एलईडी दिवे बसविण्यासाठी कोणताही खर्च करण्यात येऊ नये, असे नमूद केले आहे. पथदिव्यामध्ये ऊर्जा बचतीचे प्रकल्प राबविण्यासाठी महाऊर्जाकडून नागरी स्थानिक स्वराज संस्थांना 50 लाखांपर्यंतचे अर्थसहाय्य एक्सो अकाऊंटमध्येच जमा करण्यात येणार आहे.