Sat, Feb 29, 2020 12:08होमपेज › Kolhapur › आखाती देशातही कोल्हापुरी गुळाची भुरळ

आखाती देशातही कोल्हापुरी गुळाची भुरळ

Published On: May 30 2018 2:18AM | Last Updated: May 30 2018 12:45AMकोल्हापूर : डी. बी. चव्हाण

आधुनिक युगात पिके, फळे, फुले यासह अन्य घटकांमध्ये बदल झाले. मात्र, कोल्हापुरी गूळ शेतीमालावर प्रक्रिया करून तयार केलेला  असल्याने त्याचा रंग, चव, गोडी कधीही कमी झाली नाही. त्यामुळे आखाती देशात कोल्हापुरी गुळाची भुरळ  कायम आहे. यावर्षी हंगामात कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीतून अडीच हजार टन गुळाची निर्यात झाली. या गुळाला प्रतिक्विंटल 3500 ते 4000 रुपये दर शेतकर्‍यांना मिळाला. 

कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांत गुळाची निर्मिती केली जाते. मात्र चव, रंग यामध्ये कोल्हापुरी गुळाला तोड नाही. त्यामुळे कोल्हापुरी गुळाला देश-परदेशात मोठी मागणी असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. यावर्षीच्या हंगामात बाजार समितीत 21 लाख गूळ रव्यांची आवक झाली. यातील मोठ्या प्रमाणावर गुळाची गुजरात मार्केटमध्ये विक्री झाली. मुंबई, दिल्ली या बाजारपेठांतही गुळाची विक्री झाली. यावर्षी जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा 3 लाख रव्यांनी उत्पादन वाढले; पण गुळाला फारसा दर नसल्याने शेतकरी नाराज आहेत. पारंपरिक पद्धतीने गुळाचे उत्पादन न घेता चांगल्या जमिनीतील उसाचा वापर केलेल्या शेतकर्‍यांना दरही चांगला मिळाल्याचे व्यापारी, बाजार समिती प्रशासनाचे मत आहे.  

निर्यातक्षम गुळाला चांगली मागणी
उत्तम जमिनीतील उसापासून तयार केलेला गूळ निर्यातीसाठी घेण्याकडे व्यापार्‍यांचा कल असतो. कर्नाटक, उत्तर प्रदेशमधील गूळ निर्यात न होण्याबाबत एका व्यापार्‍याने सांगितले की, कर्नाटकात गूळ तयार करताना साखर वापरण्याचे प्रमाण अधिक आहे. उत्तर प्रदेशातून येणारा गूळ तर थोडा खारट असतो. त्यामुळे हा खारटपणा कमी होण्यासाठी तिकडील शेतकरी गूळ तयार करण्यासाठी साखर वापरतात. कोल्हापूर जिल्ह्यात काही शेतकरी साखर वापरण्याचा प्रयोग करतात, पण त्यामुळे गूळ दरावर फरक पडतो, हे शेतकर्‍यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

कोल्हापुरी गुळाला जगभरातून मागणी आहे. त्यामुळे कोल्हापूर बाजार समितीने निर्यात गुळाला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. व्यापार्‍यांना प्रोत्साहित केले जाते. शेतकर्‍यांनी निर्यातक्षम गूळ बाजारात आणावा.  

-मोहन सालपे सचिव, कोल्हापूर बाजार समिती


                                                                                                                           
गुळाला दुबई, अमेरिका तसेच अन्य देशांतून मागणी होत असते. सध्या हंगाम संपला आहे, तरीही परदेशातून मागणी होत आहे. त्यामुळे येथील शेतकर्‍यांनी गूळ निर्मिती करत असताना निर्यातीला अडथळे ठरतील, अशा कोणत्याही घटकाचा वापर करू नये.

- निमेश वेद गूळ निर्यातदार व्यापारी