Tue, Jan 19, 2021 16:31होमपेज › Kolhapur › नोकरीच्या चिंतेतून इंजिनिअर तरुणाची आत्महत्या

नोकरीच्या चिंतेतून इंजिनिअर तरुणाची आत्महत्या

Published On: Dec 18 2017 2:33AM | Last Updated: Dec 18 2017 2:01AM

बुकमार्क करा

कोल्हापूर / खुपिरे ः प्रतिनिधी

इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करूनही समाधानकारक नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्येतून स्वप्निल दाजी वडगावकर (वय 25, रा. शिंदेवाडी, करवीर) या तरुणाने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात करण्यात आली. स्वप्निल अत्यंत हुशार आणि होतकरू मुलगा होता. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून त्याने पुण्यातील एका कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले. त्यानंतर तो कोल्हापुरात परतला. सध्या शिरोली एमआयडीसीतील एका कंपनीत क्वॉलिटी इनचार्ज म्हणून तो काम करत होता. उच्च शिक्षण पूर्ण करूनही समाधानकारक नोकरी मिळत नसल्याने तो नैराश्येत होता.

घरची परिस्थिती बेताची असल्याने स्वप्निलवर मोठी जबाबदारी होती. आई, वडील व बहिणीसह स्वप्निल राहत होता. गेल्या काही  दिवसांत पोटदुखीचा त्रास असल्याने तो आणखीनच खचला; पण तो काही आयुर्वेदिक उपचारही घेत होता. शनिवारी रात्री पोटमाळ्यावर झोपण्यास जातो, असे सांगून तो गेला. सकाळी त्याला वडील उठविण्यास गेले असता पोटमाळ्यावरील वाशाला गळफास घेतल्याचे दिसून आले. वडगावकर कुटुंबावर दु:खाचे आभाळ दाजी वडगावकर यांचा स्वप्निल एकुलता मुलगा होता. बी. ई. चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर चांगल्या नोकरीच्या अपेक्षेने स्वप्निल कोल्हापुरात आला; पण योग्य पगाराची नोकरी मिळत नव्हती. कुटुंबाची गुजराण चालावी यासाठी तो एका खासगी कंपनीत नोकरीस जात होता. तो अविवाहित होता. स्वप्निलच्या आत्महत्येमुळे वडगावकर कुटुंबावर दु:खाचे आभाळ कोसळले असून गावातही हळहळ व्यक्त होत आहे.