Wed, Jan 20, 2021 22:57



होमपेज › Kolhapur › राजकीय हेतूने प्रेरित ‘गोकुळ’वरील टीका चुकीची

राजकीय हेतूने प्रेरित ‘गोकुळ’वरील टीका चुकीची

Published On: Dec 06 2017 2:01AM | Last Updated: Dec 06 2017 1:29AM

बुकमार्क करा





कोल्हापूर ःप्रतिनिधी

दर दिवसाला सुमारे 14 लाख लिटर दूध संकलन आणि दर 10 दिवसाला सुमारे 42 कोटी रुपयांचे वाटप करणार्‍या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ने हजारो शेतकर्‍यांना स्वयंपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविले. संपूर्ण राज्यात ‘गोकुळ’ने एक विश्‍वासू ब्रँड म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. गेल्या 55 वर्षांत ‘गोकुळ’ची झालेली प्रगती अभिमान वाटावा अशी आहे आणि त्याचे श्रेय जितके दूध उत्पादक शेतकर्‍यांना आहे, तितकेच ‘गोकुळ’चा कारभार करणार्‍यांनाही! पण गेल्या वर्ष-दोन वर्षात ‘गोकुळ’वर सत्ता कोणाची, या चढाओढीतून अस्वस्थ करणारे आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. ‘गोकुळ’ने नुकताच गायीच्या दुधाचा दर प्रतिलिटर 2 रुपयाने कमी केला आणि त्याच्या आडून पुन्हा ‘गोकुळ’मध्ये राजकीय हेतूने प्रेरित आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ‘गोकुळ’च्या खर्‍या हितचिंतकाला त्याचेच शल्य आहे, असे ‘गोकुळ’चे चेअरमन विश्‍वास पाटील यांनी म्हटले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण जगभर आणि देशातही गायीच्या दुधाचे वाढते उत्पादन होत असल्याने आणि दूध पावडरचे दर जागतिक बाजारपेठेत कोसळल्याने, नवे संकट निर्माण झाले आहे. पुरवठा जास्त मात्र मागणी कमी, या व्यस्त प्रमाणामुळे गायीच्या दुधाचे दर देशभरात कोलमडले आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकारने गायीच्या दुधासाठी उत्पादकांना 2 रुपये प्रतिलिटर वाढवून द्यावेत, असा आदेश काढला. दुधाच्या उत्पादनवाढीच्या काळात गायीच्या दुधाला आणि अन्य पूरक उत्पादनांना मागणी घटली असतानाच कोणत्याही दूध संघाला गायीच्या दूध दराला वाढ देणे परवडणारे नव्हते. त्यामुळे ‘गोकुळ’सह राज्यातील अनेक सहकारी दूध संस्थांनी गायीच्या दुधाला दर वाढवून देणे अशक्य असल्याचे जाहीर केले.

वास्तविक, ‘गोकुळ’कडून गायीच्या दुधाला राज्यात सर्वाधिक सुमारे 25 रुपये प्रतिलिटर इतका दर दूध उत्पादकांना दिला जात असतानाच राज्य सरकारच्या आदेशानुसार ‘गोकुळ’ने 2 रुपये दरवाढ करून उत्पादकांना 27 रुपये प्रतिलिटर दर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र, त्यातून संस्थेचा आर्थिक तोटा वाढू लागला. सभासदांच्या दूरगामी हिताच्या दृष्टीने आणि संस्थेचे अस्तित्व टिकवण्यासाठी काही कटू व कठोर निर्णय घेणे आवश्यक असते. त्यामुळेच ‘गोकुळ’ने वाढता तोटा लक्षात घेऊन गायीच्या दुधाचा दर 2 रुपयांनी कमी करून पुन्हा प्रतिलिटर 25 रुपये इतका आणला. राज्यात सरासरी 21 रुपये ते 23 रुपये प्रतिलिटर इतका गायीच्या दुधाचा दर असताना, ‘गोकुळ’ 25 रुपयांच्या खाली दर देत नाही, हे वास्तव आहे. ‘गोकुळ’च्या कारभाराचा बारकाईने अभ्यास केला, तर 1 रुपया उत्पन्नातील 82 पैसे दूध उत्पादकाला दिले जातात आणि केवळ 18 पैशांमध्ये ‘गोकुळ’चा व्यवस्थापन खर्च आहे. राज्यातील अन्य सहकारी संस्थांमध्ये हाच व्यवस्थापन खर्च 32 पैशांपर्यंत आहे. त्यामुळे ‘गोकुळ’ने आजवर काटकसरीचा कारभार केला. यालाही निश्‍चित आधार आहे. मात्र, पराकोटीच्या राजकारणातून ‘गोकुळ’च्या कारभाराबद्दल विनाकारण संभ्रमाची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न राजकारणातून होऊ लागला आहे.

माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यातील राजकीय वादाचे सावट ‘गोकुळ’वर पडत असल्याने, वस्तुस्थिती समजावून न घेता, राजकीय ईर्ष्या भलतीकडेच चालली आहे. जनतेची किंवा सभासदांची दिशाभूल करून, राजकीय विरोधातून आरोप झाल्यामुळे अनेक सहकारी संस्था बंद पडल्याची उदाहरणे आहेत. ‘गोकुळ’ प्रशासनावर आणि संचालक मंडळावर बहुतांश दूध उत्पादक शेतकर्‍यांचा ठाम विश्‍वास आहे. मात्र, ज्या पद्धतीने आमदार सतेज पाटील यांच्याकडून ‘गोकुळ’च्या कारभाराबद्दल आरोप केले जात आहेत, ते पाहता जिल्ह्यातील राजकीय संघर्ष कुठल्या वळणावर येऊन ठेपला आहे, त्याचे सर्वच नेत्यांनी चिंतन करणे गरजेचे आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी ‘गोकुळ’च्या लढाईत उडी घेऊन, हा राजकीय आखाडा नसल्याचे म्हटले आहे. मात्र,

त्यानंतरही आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यात सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप, राजकीय लढाईचाच भाग आहेत. अशा परिस्थितीत ‘गोकुळ’ जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकर्‍यांचा आधारवड आहे आणि आपण राजकीय हेतूने आरोप करत असताना,  ‘गोकुळ’च्या नावलौकिकाला आणि विश्‍वासाला बाधा तर आणत नाही ना, याचा विचार नेतेमंडळींनी केला पाहिजे. 
केवळ सूडभावनेने किंवा राजकीय द्वेषातून आरोप होत असतील आणि त्यातून एखाद्या विस्तारलेल्या सहकारी संस्थेला गालबोट लागत असेल, तर दूध उत्पादक शेतकरीही गप्प बसणार नाहीत. त्यामुळेच 7 डिसेंबरला पुकारलेल्या मोर्चाला दूध उत्पादक शेतकरी मोठा प्रतिसाद देतील.  तुमचे राजकारण गेले चुलीत, आम्हाला आमचा ‘गोकुळ’ संघ प्रगतिपथावर ठेवायचा आहे, या भावनेने दूध उत्पादक शेतकर्‍यांनी नेतेमंडळींना सुनावले पाहिजे. कारण, ‘गोकुळ’वर खरी मालकी दूध उत्पादक शेतकर्‍यांची आहे. कुणी जर राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी ‘गोकुळ’ची ढाल पुढे करत असेल, तर त्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे, असे निवेदनात म्हटले आहे.