कोल्हापूर : प्रतिनिधी
थंडीच्या कडाक्याने गारठून वृद्धासह दोन फिरस्त्यांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकाची ओळख पटली असून दुसर्या महिलेची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. शासकीय रुग्णालय आवार व मंगळवार पेठेतील बेलबागेजवळ या घटना घडल्या. दस्तगीर नियाम नदाफ (वय 50, रा. रजपूतवाडी, ता. करवीर) हे दहा वर्षांपूर्वी घरातून बाहेर पडले होते. मंगळवार पेठ परिसरात त्यांचा वावर होता. दोन दिवसांपासून ते कडाक्याच्या थंडीत गारठून गेले होते. बुधवारी पहाटे त्यांची प्रकृती बिघडली.
नागरिकांनी बेशुद्धावस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. तथापि, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. खिशातील चिठ्ठीमुळे त्यांच्या रजपूतवाडीतील नातलगांचा शोध लागला. सुमारे 78 वर्षीय महिला शासकीय रुग्णालय आवारातील केसपेपर नोंदणी खिडकीजवळ गारठून बेशुद्ध पडल्याचे बुधवारी हवालदार पी. के. जाधव, कॉन्स्टेबल कृष्णा कावडे यांच्या निदर्शनास आले. अनोळखी महिलेला त्यांनी उपचारार्थ दाखल केले. मात्र, त्यांचाही मृत्यू झाला. लक्ष्मीपुरी व जुना राजवाडा पोलिस ठाण्यात घटनांची नोंद झाली आहे.