होमपेज › Kolhapur › सेवा केंद्र उभारणीत कोल्हापूर राज्यात अव्वल

सेवा केंद्र उभारणीत कोल्हापूर राज्यात अव्वल

Published On: Aug 21 2018 1:36AM | Last Updated: Aug 20 2018 11:44PMकोल्हापूर : विकास कांबळे 

पंचायत राज संस्थांच्या कारभारात पारपदर्शकता आणण्यासाठी तसेच लोकांना आवश्यक असलेले सेवा दाखले लवकर मिळावे यासाठी सुरू केलेल्या ई पंचायत प्रकल्पांतर्गत आपले सरकार सेवा केंद्र (आस्क) उभारणीत पश्‍चिम महाराष्ट्र आघाडीवर असून राज्यात कोल्हापूर जिल्ह्याने अव्वल स्थान पटकाविले आहे. सांगली जिल्ह्याने द्वितीय तर पुणे जिल्ह्याने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

शासनाने डिजिटल इंडिया मधील एक मिशन मोड विकास कार्यक्रम राज्यात संग्राम या नावाने 2011 ते 2015 या कालावधीत राबविण्यात आला. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन व टाटा कन्सलटन्सी यांची सहभागिदारी कंपनी महाऑनलाईन ही अंमलबजावणी यंत्रणा होती. या प्रकल्पाचा पुढचा टप्पा राज्य शासनाच्या ग्रामविकास विबाग, माहिती तंत्रज्ञान संचलनालय यांच्या संयुक्‍त विद्यमाने आपले सरकार सेवा केंद्र या नावाने सुरू करण्यात आला. या प्रकल्पाचा मुख्य हेतू ग्रामपंचायतींचे संगणकीकरण करणे आणि त्याद्वारे लोकांना आवश्यक त्या सेवा सुविधा पुरविणे हा आहे. यात जन्म,  मृत्यू नोंद व प्रमाणपत्र, रहिवास दाखला, विवाह नोंदणी दाखला, मालमत्ता कर आकारणी, बेरोजगार प्रमाणपत्र, वीज जोडणीसाठी लागणारा ना हरकत दाखला, जॉब कार्ड,  बांधकामासाठी लागणारे अनुमती प्रमाणपत्र आदी 15 प्रकाराचे दाखले या सेवा केंद्रांद्वारे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. अशा प्रकारची सेवा केंद्र संपूर्ण राज्यात सुरू करण्यात येत आहे. त्यामध्ये पुणे विभाग आघाडीवर आहे. पहिल्या पाच जिल्ह्यांच्या यादीत तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यात कोल्हापूर जिल्हा राज्यात अव्वल आहे. जिल्ह्यात 1027 ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. ही संख्या 723 इतकी आहे.

यात 15 लाखांपेक्षा अधिक  उत्पन्‍न असणार्‍या 323 ग्रामपंचायतीत, 15 लाखांच्या आत उत्पन्‍न असलेल्या 178 ग्रामपंचायतीत सेवा केंद्र सुरू करण्यात आली आहेत. याशिवाय 15 लाखांच्या आत उत्पन्‍न असलेल्या परंतु क्‍लस्टर प्रमाणे स्थापन केलेल्या सेवा केंद्र असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या 222 इतकी आहे. कोल्हापूर नंतर सेवा केंद्र उभारणीत सांगली जिल्ह्याचा क्रमांक लागतो. सांगलीत 699 ग्रामपंचायती आहेत त्यापैकी 599 ग्रामपंचायतींमध्ये सेवा केंद्र सुरू करून दुसरा क्रमांक मिळविला आहे. पुणे जिल्ह्याचा राज्यात चौथा क्रमांक लागतो. या जिह्यात 1399 ग्रामपंचायती आहेत त्यापैकी 871 ग्रामपंचायतींमध्ये सेवा केंद्र सुरू करण्यात आली आहे.यानंतर सातारा व सोलापूर जिल्ह्याचा क्रमांक लागतो. सातार जिल्ह्याने 1496 ग्रामपंचायतींपैकी 773 गावांत सेवा केंद्र सुरू करून राज्यात अकरावा क्रमांक मिळविला आहे.