Thu, Nov 26, 2020 20:55होमपेज › Kolhapur › कोल्हापूरच्या जवानाला काश्मीरमध्ये वीरमरण

कोल्हापूरच्या जवानाला काश्मीरमध्ये वीरमरण

Last Updated: Nov 22 2020 2:00AM
कौलव : पुढारी वृत्तसेवा

शनिवारी पहाटे जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नौशेरा येथे पाकिस्तानी सैन्याशी झालेल्या चकमकीत निगवे खालसा (ता. करवीर) येथील जवान हवालदार संग्राम शिवाजी पाटील (वय 37) हे शहीद झाले. बढतीनंतर वाढीव सेवाकालात देशभक्‍तीला वाहून घेतलेल्या जिगरबाज जवानाला वीरगती प्राप्‍त झाली. पाटील यांना वीरमरण आल्याच्या वृत्तानंतर जिल्ह्यावर शोककळा पसरली.

संग्राम पाटील हे सैन्यदलात गेली वीस वर्षे देशसेवा बजावत होते. संग्राम यांचे प्राथमिक शिक्षण निगवे येथील प्राथमिक शाळेत झाले होते. माध्यमिक शिक्षण चनिशेटी विद्यालय तसेच येळवडे येथे आजोळी झाले होते. संग्राम पाटील फेबु्रवारी 2001 मध्ये मराठा लाईट इन्फंट्रीत जीडी शिपाई म्हणून दाखल झाले होते. त्यांनी बेळगाव, पुंछ, जम्मू, दिल्‍ली येथे सेवा बजावली होती. सतरा वर्षांच्या सेवेनंतर त्यांना हवालदारपदी बढती मिळाली होती.

शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास राजौरीतील नौशेरा सीमेवर पाकिस्तानी सैन्याशी झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले.पहाटे चारच्या सुमारास संग्राम यांचा भाऊ संदीप याला भ—मणध्वनीवर संग्राम  शहीद झाल्याचे कळवण्यात आले. ही धक्‍कादायक बातमी ऐकताच संदीपचे काळीज अक्षरशः फाटले. मात्र, गोठलेले मन आणि थिजलेल्या भावनांना आवर घालत त्याने आई-वडिलांना संग्राम हल्ल्यात जखमी झाल्याचे सांगितले. तेव्हाच त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. 

गावात सन्‍नाटा

गावात व परिसरात हे वृत्त  वार्‍यासारखे पसरताच सर्वत्र सन्‍नाटा पसरला. चौकाचौकांत रस्त्यांवर लोक  एकत्र जमून चर्चा करत होते. संग्राम यांच्या घरी या दुःखद घटनेची माहिती  कळू नये, याची ग्रामस्थांनी पुरेपूर दक्षता घेतली होती. त्यांच्या गल्‍लीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. गल्‍लीतील वृत्तवाहिन्यांची केबलही बंद करण्यात आली होती. संग्राम यांच्या पश्‍चात 
आई-वडील, पत्नी, भाऊ, आठ वर्षांचा मुलगा शौर्य व तीन वर्षांची मुलगी शिवश्री असा परिवार  आहे. 

सोमवारी होणार अंत्यसंस्कार

संग्राम यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी गावातील मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आ. ऋतुराज पाटील, माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह पोलिस व सैन्यदलातील अधिकार्‍यांनी गावाला भेट देऊन अंत्यसंस्काराच्या  पूर्वतयारीची पाहणी केली.

पाकबद्दल संतापाची लाट

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात संग्राम शहीद झाल्याचे वृत्त सोशल मीडियावरून पसरताच निगवे पंचक्रोशीत पाकच्या नापाक कृत्याबद्दल तीव— संतापाची लाट पसरली. मैदानावर जमून ग्रामस्थ व तरुणांनी पाकच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

आधी व्हिडीओ कॉल लावा

संग्राम यांच्या पत्नी माहेरी हसूर दुमाला येथे गेल्या होत्या. संग्राम यांच्या वीरगतीचे वृत्त कळताच त्यांना माहेरहून आणण्यात आले. मात्र, गावात येताच त्यांना काही तरी अघटित घडल्याचे जाणवताच त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. त्यांना संग्राम जखमी झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांनी आधी व्हिडीओ कॉल लावा म्हणत काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश करताच ग्रामस्थांचे डोळे पाणावले.