Mon, Sep 28, 2020 13:47होमपेज › Kolhapur › मला महापौर व्हायचंय कारण

मला महापौर व्हायचंय कारण

Published On: Dec 18 2017 2:34AM | Last Updated: Dec 17 2017 11:28PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

काँगे्रसचे नेते आ. सतेज पाटील यांनी महापौरपदासाठी रविवारी इच्छुकांच्या मुलाखती घेऊन मते जाणून घेतली. चौघेजण या पदासाठी इच्छुक आहेत. अंतिम निर्णय आ. पाटील घेणार असून, सोमवारी दुपारी नाव जाहीर करण्यात येणार आहे. काँग्रेस उमेदवाराचा अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेस नगरसेवक तीन दिवस सहलीवर जाणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीची महापालिकेत सत्ता आहे. पाच वर्षांसाठी दोन्ही पक्षांतर्फे विभागणी करण्यात आली आहे.

महापौरपद सध्या ओबीसी महिलासाठी राखीव असून, पहिल्या वर्षी काँग्रेस, तर यंदा राष्ट्रवादी काँग्रेसकडे महापौरपद आहे. यानुसार राष्ट्रवादीच्या फरास महापौर झाल्या होत्या. फरास यांनी मुदत संपल्याने 12 डिसेंबरला महापौरपदाचा राजीनामा दिला आहे. तर उपमहापौर अर्जुन माने यांनीही राजीनामा दिला आहे. उर्वरित कालावधीसाठी महापौरपद काँग्रेसकडे, तर उपमहापौरपद राष्ट्रवादीकडे जाणार आहे. नूतन महापौर, उपमहापौरपदासाठी 22 डिसेंबर रोजी विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे. सोमवारी (दि. 18) दुपारी तीन ते पाच या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ  आहे. 

काँग्रेस नेते आ. सतेज पाटील यांनी  महापौरपदासाठी नगरसेवक आणि समर्थकांची मते जाणून घेतली आहेत. तसेच रविवारी इच्छुकांच्या मुलाखती घेऊन प्रत्येकाचे मत आजमावले आहे. यामध्ये स्वाती यवलुजे, उमा बनछोडे, दीपा मगदूम, निलोफर आजरेकर या इच्छुकांचा समावेश आहे. काँग्रेस कमिटीत झालेल्या मुलाखतीवेळी शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, प्रदेश चिटणीस नगरसेवक तौफीक मुल्लाणी, महिला आघाडी अध्यक्षा सौ. संध्याताई घोटणे, सौ. वनिता देठे, संपत चव्हाण, स्थायी सभापती डॉ. संदीप नेजदार, गटनेते शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, प्रवीण केसरकर यांच्यासह माजी पदाधिकारी, नगरसेविका, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

इच्छुकांची मते जाणून घतल्यानंतर आ. सतेज पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले, सोमवारी दुपारी दोन वाजता महापौरपदासाठी उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल. महापालिकेत बिनविरोध महापौर होण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न करावेत. त्यानिमित्ताने चांगला पायंडा पडण्यास मदत होणार आहे. 

उपमहापौरपदासाठी आ. मुश्रीफ यांनी कागलात घेतल्या मुलाखती

महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी उद्या, सोमवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने सत्ताधारी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी आणि विरोधी भाजप-ताराराणी आघाडीमध्ये रविवारी दिवसभर खलबते सुरू होती. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचे नेते आ. हसन मुश्रीफ यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. विरोधी भाजप- ताराराणी आघाडीची सोमवारी (दि. 18) सकाळी अकरा वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत या दोन्ही पदांसाठी उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार आहे. 

आ. हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी नगरसेवकांची तातडीने कागल विश्रामगृहात बैठक घेतली. यावेळी आ. मुश्रीफ यांनी उपमहापौरपदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेऊन मते जाणून घेतली. यामध्ये गटनेता सुनील पाटील, सचिन पाटील आणि सौ. वहिदा सौदागर यांचा समावेश आहे. सोमवारी उपमहापौरपदाचे नाव जाहीर करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक, पदाधिकारीही सहलीवर रवाना होणार आहेत. या बैठकीस आर. के. पोवार, प्रा. जयंत पाटील, मावळत्या महापौर सौ. हसिना फरास, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर यांच्यासह राष्ट्रवादीचे नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. दरम्यान, विरोधी भाजप-ताराराणी आघाडीने महापौर, उपमहापौरपदासाठी दावा केला आहे. महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवार निश्‍चित केला जाणार आहे. तर उपमहापौरपदासाठी ताराराणी आघाडीच्या उमेदवारास प्राधान्य दिले जाणार आहे.