Sat, Jul 11, 2020 18:36



होमपेज › Kolhapur › कोल्हापूर आर्थिकद‍ृष्ट्या संवेदनशील

कोल्हापूर आर्थिकद‍ृष्ट्या संवेदनशील

Published On: Apr 07 2019 1:45AM | Last Updated: Apr 07 2019 1:29AM




कोल्हापूर: प्रतिनिधी

आर्थिकद‍ृष्ट्या संवेदनशील मतदार संघाच्या यादीत निवडणूक आयोगाने कोल्हापूरचा समावेश केला आहे. निवडणुकीत या मतदार संघात 500 कोटींपर्यंत आर्थिक उलाढाल होऊ शकते. यामुळे या मतदार संघातील घडामोडींवर अधिक लक्ष देण्यात येणार असून प्रशासनाने विविध पथकांची संख्या वाढवली आहे.

निवडणूक आयोगाने आर्थिकद‍ृष्ट्या संवेदनशील मतदार संघाविषयी माहिती मागवली होती. त्यानुसार प्राप्तिकर विभागाने कोल्हापूर मतदार संघात मोठ्या प्रमाणात आर्थिक घडामोडी होऊ शकतात, असा अहवाल आयोगाला सादर केला. मतदारांना वेगवेगळ्या पद्धतीने आमिष दाखवणे, वस्तू-साहित्यांचे वाटप करणे, वेगवेगळ्या प्रकारे कार्यक्रमांचे आयोजन करून मतदारांना खूश करणे, पैसे, मद्य याचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करणे, दागिने, जमीन-खरेदी व्यवहाराद्वारे आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर मतदार संघातील लढत चुरशीची आहे. तुल्यबळ उमेदवार आहेत. कोल्हापूर मतदार संघ गोवा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर आहे. यामुळे या दोन्ही राज्यांतून मद्य व पैशाचीही आवक होऊ शकते. त्यातून मतदान प्रक्रियेत गैरप्रकार होण्याचीही शक्यता आहे. यासर्व पार्श्‍वभूमीवर संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

कोल्हापूर आर्थिकद‍ृष्ट्या संवेदनशील म्हणून जाहीर झाल्यानंतर निवडणूक आणि पोलिस प्रशासनाला यंत्रणा वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने भरारी पथके, व्हिडीओ पथके, स्थिर निरीक्षण पथके आदींच्या संख्येत वाढ केली आहे. 

गोवा, कर्नाटक राज्यांच्या सीमा भागातील तपासणी नाके, यासह गस्त पथके आदींद्वारे प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. पैसे अथवा मद्य वाटप, चोरटी वाहतूक आदींबाबत माहिती असल्यास सीव्हीजील अ‍ॅपद्वारे तसेच स्थानिक प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.