कोल्हापूर : पुढारी आॅनलाईन
आंतरजिल्हा बदली सॉफ्टवेअरमध्ये शून्यबिंदू नामावलीचा समावेश करा, अशी मागणी कोल्हापूर आंतरजिल्हा बदली संघर्ष समितीने केली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कोल्हापूर आंतरजिल्हा बदली संघर्ष समितीने याबाबत निवेदन सादर करून आंतरजिल्हा बदल्यांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी एकमुखाने केली आहे.
कोल्हापूर आंतरजिल्हा बदली संघर्ष समितीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवदेन सादर करताना म्हटले आहे की, गेल्या 3 टप्प्यात खुला प्रवर्ग आणि कोकणातील बदल्या अतिशय कमी प्रमाणात झाल्या आहेत. हा एकप्रकारे या समूहावर मोठा अन्याय झाला आहे. शासनाने अभ्यासगट नेमून त्यावर कार्यवाही करण्याचे योजिले व त्यानुसार पुणे येथे पाच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विचार विनिमय सभा संपन्न झाली.
या सभेत सुमारे ४० राज्यस्तरीय संघटना सहभागी झाल्या. सर्वांच्या अजेंड्यावर शून्यबिंदूनामावली हा विषय अग्रभागी राहिला. तशी निवेदनेही शासनाला सादर करण्यात आली. या सर्व सर्व संघटनांच्या माहिती स्वीकारून सॉफ्टवेअरमध्ये तसा बदल करावा असे समितीने म्हटले आहे.
बीड जिल्ह्यामध्ये अतिरिक शिक्षक असतानाही आंतरजिल्हा बदलाने गेलेल्या शिक्षकांना जागा नसताना सामावून घेतले गेले व त्यांचा बिंदू भविष्यात रिक्त होणाऱ्या जागांवर सामावून घेण्यात आला. या धर्तीवर प्रश्न मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी समितीने केली आहे.
शुन्य बिंदू नामावलीचा वापर केल्याने कोणत्याही प्रवर्गावर अन्याय होणार नाही. जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षक असताना आंतरजिल्हा बदल्या शक्य आहेत. या शून्यबिंदूनामावलीचा वापर केल्याने सर्व संवर्गाना लाभ मिळेल व त्यांची सेवाजेष्ठताही टिकेल, असेही संघर्ष समितीने निवदेनात म्हटले आहे.
खुल्या प्रवर्गातील व कोकणातील अनेक शिक्षक गेली १४ ते १५ वर्ष घरापासून दूर राहून शैक्षणिक सेवा देत आहेत. त्यांचे मानसिक स्वास्थ हरवले आहे त्यांना शून्यबिंदूचा वापर करून न्याय देणे योग्य राहील. शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन वस्तीशाला शिक्षकांप्रमाणे आंतरजिल्हा बदलीग्रस्ताना न्याय देण्यात यावा व तसा सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात यावा, अशी विनंती निवेदनातून केली आहे.