Wed, Jan 20, 2021 23:54होमपेज › Kolhapur › जिल्ह्यात दारू पिण्याच्या 85 हजार परवान्यांची विक्री

जिल्ह्यात दारू पिण्याच्या 85 हजार परवान्यांची विक्री

Published On: Dec 31 2017 1:51AM | Last Updated: Dec 31 2017 1:17AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

दारू पिण्याचा एक दिवसाचा परवाना घेण्यासाठी मोठा प्रतिसाद लाभत आहे. शनिवारअखेरपर्यंत 85 हजारांवर तळीरामांनी परवाने घेतले आहेत. रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत हे परवाने देण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान, यावर्षी पहाटे पाच वाजेपर्यंत बिअर बार, परमीट रूम आणि विदेशी दारूची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जंगी पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. या पार्टीमध्ये दारू ही असतेच, या कालावधीत दारू पिणार्‍यांंजवळ परवाने असले पाहिजेत, अन्यथा दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी आढळल्यास तो गुन्हा ठरतो. त्यामुळे अशा लोकांसाठी दारू पिण्याचा एक दिवसाचा परवाना देण्यात येत आहे. विदेशी दारू पिणार्‍यांसाठी परवाना शुल्क 5 रुपये आणि देशी दारूसाठी 2 रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. 

दारू पिण्याच्या परवान्याच्या नियमांची माहिती नसल्यामुळे किंवा परवाना घेण्याची प्रक्रिया माहीत नसल्यामुळे बहुतांशी लोक परवाने घेत नाहीत. या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग लोकांना 31 डिसेंबरच्या पार्टीचा आनंद द्विगुणीत करता यावा, यासाठी एक दिवसांचा परवाना देते. यासाठी परवानाधारक बिअर बार व हॉटेलमधून हे परवाने देण्याची सोय करण्यात आली आहे.

गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यात 85 हजारांवर परवान्यांची विक्री झाली आहे. शासनाने कोल्हापूर विभागाला दीड लाख परवाने देण्याचे उद्दिष्ट दिले आहे. तळीरामांच्या सोईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने थेट बिअर बार, परमीटरूमधून दारू पिण्याच्या परवान्याच्या विक्रीला मद्यपींकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.