कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कौमार्य चाचणीत वधू अयशस्वी ठरल्याचे कारण सांगून बेळगावमधून सख्ख्या बहिणींना हाकलून दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. विवाहानंतर अवघ्या तीन दिवसांतच हा प्रकार घडला होता. याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने हे कृत्य करणाऱ्या सख्ख्या भावांविरोधात तक्रार दाखल करण्याचे काम राजारामपुरी पोलिसात सुरू आहे.
अधिक वाचा : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत लससाठा संपला
अधिक माहिती अशी की, कोल्हापुरातील राजेंद्र नगर परिसरात दोन सख्ख्या बहिणींचा विवाह कर्नाटक राज्यातील मुलांसोबत २७ नोव्हेंबर २०२० ला झाला होता. एकाच जातीतील ही दोन्ही कुटुंबिय असल्यानं त्यांच्यात कौमार्य चाचणीची पद्धत आहे. त्यानुसार या दोन्ही मुलींची परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये एक मुलगी अपयशी ठरली. या घटनेनंतर संबंधित दोन्ही मुलींच्या चारित्र्यावर संशय घेत सासरच्या मंडळींकडून त्यांच शारीरिक आणि मानसिक शोषण सुरू होते. लग्नानंतर ३ दिवसांनी सासरच्या मंडळींनी घरातून हाकलून माहेरी पाठवले. यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी नाते संबंध जुळवून आणण्याचा प्रयत्न केला. पण सर्व प्रयत्न फोल ठरले. दरम्यान ३ फेब्रुवारी २०२१ रोजी जात पंचायत बसवण्यात आली. पंचायतीने त्या दोन मुलींना काडीमोड झाला असल्याचा निर्णय दिला.
अधिक वाचा : 'कोरोना'नंतर कोरडा खोकला कशामुळे होतो?
या घटनेनंतर पीडित मुलींच्या कुटुंबियांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे दाद मागितली. समितीच्या गीता हसुरकर, रमेश वडणगेकर, सुजाता म्हेत्रे, सीमा पाटील यांनी हे प्रकरण गांभीर्यान घेतलं. याबाबत त्यांनी राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्याशी चर्चा केली. पीडित मुलींकडून या प्रकरणी राजारामपुरी पोलिसात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे.