Thu, Jul 02, 2020 10:51होमपेज › Kolhapur › जिल्हा होतोय बालकामगारमुक्‍त

जिल्हा होतोय बालकामगारमुक्‍त

Published On: Jun 12 2019 1:19AM | Last Updated: Jun 11 2019 11:27PM
कोल्हापूर :  प्रिया सरीकर

कोल्हापूर जिल्हा सधन असल्याने स्थलांतरित कुटुंबांची ये-जा येथे कायमचीच. परिणामी, गेल्या काही वर्षांपूर्वी या ठिकाणी बालकामगारही सर्रास आढळत होते; पण गेल्या पाच वर्षांत हे चित्र बदलले आहे. जिल्ह्यातील बालकागारांची संख्या कमी झाली आहे. सिग्‍नलवर खेळणी, वस्तू विक्री करणार्‍या स्थलांतरित परप्रांतीय कुटुंबांतील मुलांचाच  बालमजुरीसाठी वापर होतोय. स्थानिक पातळीवर जिल्हा बालकामगारमुक्‍त होत असल्याचा निष्कर्ष चाईल्ड लाईन संस्थेच्या अभ्यासातून पुढे आला आहे. 

मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांना उत्तम पोषण आहार, शैक्षणिक सुविधा व पोषक वातावरण देण्याचा दृष्टिकोन बाळगूण 2021 पर्यंत जगभरातील बालमजुरी थांबविण्याचे ध्येय ‘युनो’ने बाळगले आहे. त्यानुसार लहान मुलांसाठी काम करणार्‍या संस्थांना जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. देशातील बालकामगारांची संख्या मोठी असली, तरी कोल्हापूर जिल्हा मात्र आता बालकामगारमुक्‍तीकडे वाटचाल करीत असल्याचे सुखावह चित्र आहे. या ठिकाणी केवळ स्थलांतरित परप्रांतीय कुटुंबांतील मुलेच बालमजुरी करताना आढळतात; सण-उत्सवांच्या महिन्यांत म्हणजे ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत शहरासह ग्रामीण भागात रस्त्यांवर खेळणी व अन्य वस्तूंची विक्री करताना ही मुले आढळतात. शहरात महाद्वार रोड, भवानी मंडप, ताराराणी चौक, कोल्हापूर बसस्थानक परिसरात भीक मागताना, तसेच मजुरी करताना चाईल्ड लाईन संस्थेला मुले आढळली आहेत. बालमजुरी करणार्‍या मुलांना ताब्यात घेऊन बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले जाते. त्यानंतर संबंधित मुलांच्या पालकांना बोलावून समज देऊन त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे चाईल्ड लाईनकडून सांगण्यात आले. 

कोल्हापूर शहरात बालमजुरी करताना आढळलेली मुले ही उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आदी भागातून आलेली आहेत. यापैकी अनेक मुले ही नातेवाईकांसोबत गाव सोडून मजुरीसाठी बाहेर पडलेली होती तर काहींजण एक पालक म्हणजेच केवळ आईसोबत  गाव सोडून आलेली होती. कुटुंबातील मुलांची संख्या जास्त असल्याने पैसे कमावण्याची जबाबदारी असल्याचेही मुलांकडून अनेकदा सांगितले जाते. आजवर आढळलेल्या बालकामगार मुलांना नाईलाजाने शिक्षण थांबवून मोलमजुरी करावी लागत असल्याचे चाईल्ड लाईनच्या समन्वयक अनुजा खुरंदळ यांनी सांगितले. समाजाचा एक सुज्ञ घटक म्हणून आपल्या भागात बालमजूर आढळल्यास चाईल्ड लाईनच्या 1098 या टोल फ्री क्रमांकावर फोन करुन माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

गेल्या 5 वर्षांतील बालकामगार संख्या

वर्ष             बालकामगार संख्या
2014-15     41
2015-16    29
2016-17    28
2017-18    56
2018-19    25