Wed, Jan 20, 2021 10:03होमपेज › Kolhapur › जिल्ह्याचा पुढील वर्षाचा ३६५कोटींचा आराखडा

जिल्ह्याचा पुढील वर्षाचा ३६५कोटींचा आराखडा

Published On: Dec 06 2017 2:01AM | Last Updated: Dec 06 2017 1:36AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्याच्या 2018-19 या वर्षासाठी एकूण 364 कोटी 83 लाखांचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला मंगळवारी जिल्हा नियोजन समितीच्या लहान गटाच्या बैठकीत मान्यता मिळाली. अध्यक्षस्थानी आ. सुरेश हाळवणकर होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उद्या, बुधवारी (दि. 6) होणार्‍या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा आराखडा सादर केला जाणार आहे.
या वार्षिक आराखड्यात  सर्वसाधारण योजनांसाठी 249 कोटी 52 लाख, विशेष घटक योजनेसाठी 113 कोटी 41 लाख, ओटीएसपीसाठी 1 कोटी 90 लाखांची तरतूद केली आहे. जिल्हा सर्वसाधारण योजनेंतर्गत जिल्हास्तरीय  योजनांसाठी 199 कोटी 62 लाख, नावीन्यपूर्णसाठी 8 कोटी 73 लाख, तर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी 37 कोटी 42 लाख 80 हजार इतका निधी प्रस्तावित केला आहे. सन 2017-18 अंतर्गत झालेल्या कामांची उपयोगिता प्रमाणपत्रे प्राप्त झाल्यानंतरच पुढील वर्षीचा निधी वितरीत करण्यात येईल, उपयोगिता प्रमाणपत्राअभावी निधी अप्राप्त राहिल्यास संबंधित विभागास जबाबदार धरण्यात येईल, असे आ. हाळवणकर यांनी स्पष्ट केले.

प्रस्तावांची छाननी करून 364 कोटी 83 लाख पुढील वर्षासाठीचा आराखडा निश्‍चित झाला. यामध्ये गाभा व बिगरगाभा क्षेत्राची विगतवारी यावरही चर्चा झाली. केंद्र पुरस्कृत योजनांसाठी मार्गदर्शक सूचना केल्या. विद्युत जोडण्यांसाठी वन विभागाने तत्काळ परवानगी द्यावी, जिल्ह्यात 48 गावांमध्ये अद्यापही वाहतुकीसाठी नावेचा उपयोग होतो. त्या ठिकाणी पूल करावेत आदी सूचना आ. हाळवणकर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, सर्वसाधारण योजनेंतर्गत केवळ 80 कोटी रुपये खर्च झाला असून संबंधित विभागांनी प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवावेत. यावेळी हेमंतराव कोलेकर, विजय सूर्यवंशी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव आदी उपस्थित होते.