Thu, Sep 24, 2020 16:42होमपेज › Kolhapur › रस्त्यांवर ‘घाण’ करणे पडणार महागात

रस्त्यांवर ‘घाण’ करणे पडणार महागात

Published On: Dec 31 2017 1:51AM | Last Updated: Dec 31 2017 1:48AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : अनिल देशमुख

रस्त्यांवर ‘घाण’ करणे आता महागात पडणार आहे. घाण करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दंडाची रक्कम निश्‍चित करण्यात आली असून, मनपा, नपांना दंड वसुलीचे अधिकार देण्यात आले आहेत. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश नगरविकास विभागाने शनिवारी दिले आहेत. राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले जात आहे. त्याद्वारे घनकचरा व्यवस्थापन आणि हागणदारीमुक्त शहरे याद्वारे राज्यातील शहरे स्वच्छ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या अभियानांतर्गत ज्या कुटुंबाकडे शौचालयाची सुविधा नाही, त्यांना ती सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्याचा सर्व नागरी भाग एक ऑक्टोबर रोजी हागणदारीमुक्त झाल्याचेही घोषित करण्यात आले आहे. तसेच ओला व सुका कचर्‍यावर प्रक्रिया करण्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या अभियानाला नागरिक, संस्थांनी सहकार्य करण्याची गरज आहे. मात्र, जे नागरिक, संस्था या अभियानाला सहकार्य करत नाहीत, त्यांना घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार दंड करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हे दंड करण्याचे अधिकार संबंधित महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांना देण्यात आले आहेत. तसेच या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर घाण करणार्‍यांवर आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याकरिता ‘घाण’ या संज्ञेची व्याख्याही राज्य शासनाने स्पष्ट केली आहे. तसेच दंडाची रक्कमही महापालिका वर्गवारीनुसार निश्‍चित करण्यात आली आहे. त्यानुसार कोल्हापूर शहर तसेच नगरपालिका हद्दीतील रस्त्यावर, मार्गावर घाण केल्यास 150 रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 100 रुपये, उघड्यावर लघुशंका केल्यास 100 रुपये, तर उघड्यावर शौच केल्यास 500 रुपये दंड वसूल केला जाणार आहे. यामुळे रस्त्यावर ‘घाण’ करणे आता नागरिकांना चांगलेच महागात पडणार आहे.