Tue, Jun 15, 2021 13:38होमपेज › Kolhapur › ‘गँगस्टर्स’चं कोल्हापूर कनेक्शन

‘गँगस्टर्स’चं कोल्हापूर कनेक्शन

Published On: Apr 03 2019 1:47AM | Last Updated: Apr 02 2019 11:56PM
कोल्हापूर : दिलीप भिसे

मुंबई, पुण्यातील गँगस्टर्स; कर्नाटक, उत्तर प्रदेशसह अन्य प्रांतांतील दरोडेखोर, लुटारू टोळ्या यांच्या ‘कोल्हापूर कनेक्शन’ची दबक्या आवाजात चर्चा होती. मात्र, प्रशासनाला गांभीर्य जाणवले नाही. संघटित टोळ्यांतील गँगस्टरसह अलीकडच्या काळात नामचीन आंतरराज्य गुन्हेगार जेरबंद झाल्याने यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. स्थानिक टोळ्यांना हाताशी धरून गुंडांनी महामार्ग, निर्जन वाड्यावस्त्यांवर ठाण मांडल्याने समाजकंटकांची वाढती वर्दळ भविष्यात जिल्ह्याला घातक ठरणारी आहे.

सांगली, सातारा, सोलापूरसह मुंबई, पुण्यातून तडीपार झालेल्या शेकडो गुंडांनी जिल्ह्याचा आसरा घेतला आहे. त्यात कर्नाटकातून गंभीर गुन्ह्यांत फरार गुन्हेगारांचीही भर पडू लागली आहे. तीन पानी जुगार अड्डे निवार्‍याची सुरक्षित ठिकाणे बनली आहेत. खाण्या-पिण्यासह येथे ललनांचा ताफाही सेवेला... जणू स्वर्गसुखाचा थाटच!

गुन्हेगारी वर्तुळातील पाहुणचार नेहमीच चर्चेचा विषय... मुंबई, पुण्यात हे भलतेच प्रस्थ... अलीकडे स्थानिक टोळ्यांची दहशत वाढविण्यासाठी फरार गुन्हेगारांना आश्रय देण्याची प्रथा वाढीला लागली आहे. आणि त्यामुळेच संघटित टोळ्यांतील नामचीन गुंडांची कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत वर्दळ वाढू लागली आहे. 

कळेत केलं कामाचं नाटक, रचला बँक दरोड्याचा कट  कळे (ता. पन्हाळा) येथील यशवंत सहकारी बँकेच्या शाखेवर दोन महिन्यांपूर्वी दरोडा पडला. स्थानिक पोलिसांसह ‘एलसीबी’ने दरोडेखोरांच्या शोधासाठी जंगजंग पछाडले. अखेर उत्तर प्रदेशातील टोळीचा छडा लागला. चाँदखान नईमखानसह त्याच्या भावाने दरोड्याचा कट रचल्याचे उघड झाले. नईमखानचे पन्हाळा तालुक्यात दोन वर्षे वास्तव्य होते. येथील एका गुर्‍हाळघरात तो कामालाही होता. त्याने बँका, पतसंस्थांमधील आर्थिक उलाढालीची माहिती काढून दरोड्याचा प्लॅन रचला आणि फत्तेही केला.

म्होरक्या बिहारी, साथीदार कर्नाटकी अन् कनेक्शन कोल्हापूरचं

कागल, शिरोली, गोकुळ शिरगाव, विद्यापीठ, लक्ष्मी टेकडी परिसरात लूटमार करणार्‍या दोन टोळ्यांना राजारामपुरी, ‘एलसीबी’ने काही दिवसांपूर्वी अटक केली. टोळीचा म्होरक्या बिहारातील, साथीदार कर्नाटकातील निष्पन्‍न झाले. दोन वषार्र्ंपासून त्यांचे कारनामे सुरू होते. उजळाईवाडी, उचगाव, गांधीनगरात ठाण मांडून त्यांचे कारनामे सुरू होते. टोळीतील एकाचे मुंबईतील शार्पशूटरशीही लागेबांधे असलल्याचे निष्पन्‍न झाले होते.

मारणे टोळीच्या हालचालीवर कोल्हापुरातून रिमोट!

पुणे परिसरात प्रचंड दहशत निर्माण केलेल्या मारणे टोळीतील काही साथीदारांचा शहर, जिल्ह्यात मोकाट वावर असल्याची चर्चा आहे. दोन वर्षांपूर्वी बंदोबस्तावरील पोलिसांना हाताशी धरून सीपीआर हॉस्पिटलमध्ये बहुचर्चित गांजा पार्टी घडविण्याचा प्रयत्न झाला. ‘मोका’ कायद्यांतर्गत कारवाई झालेल्या म्होरक्याला पळवून नेण्याचा रचलेला कट लक्ष्मीपुरी पोलिसांनी उधळून लावला होता. टोळीतील बहुतांशी साथीदारांची कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. त्यामुळे साथीदारांचा कळंबा कारागृह परिसर, सीपीआर आवारात सतत वावर असतो. टोळीतील प्रमुख साथीदार कोठडीत बंद झाल्याने टोळीच्या पुण्यातील हालचालीची सूत्रे कोल्हापूर येथून नियंत्रित करण्यात येत असल्याची गुन्हेगारी वर्तुळात चर्चा आहे.. 

स्थानिक टोळ्यांशी  लागेबांधे संशयास्पद!

मुळशी तालुक्यात दहशत निर्माण केलेल्या आणि खुनाच्या गुन्ह्यात दोन वर्षे फरार झालेला टोळीचा गँगस्टर गणेश तानाजी कदम हा दोन वर्षांपासून कोल्हापुरात वास्तव्यास असल्याची माहिती उघड झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. राजारामपुरी, कदमवाडी, विद्यापीठ परिसरात आलिशान बंगल्यात फ्लॅट भाड्याने घेऊन, नाव बदलत, वेशांतर करीत संशयिताने दोन वर्षे येथे आश्रय घेतल्याने शहरात चर्चेचा विषय बनला आहे. या काळात गुन्हेगारी टोळ्यांचे म्होरके, काळेधंदेवाल्यांशी त्याचा संपर्क आला होता. हे लागेबांधे संशयास्पद ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई, पुण्यातील नामचीन गुंडांचा शहरात उघड वावर असताना ‘डीबी’ पथकांना त्याची खबरबात नसावी, हे आश्‍चर्य आहे.