Wed, Jan 20, 2021 00:31होमपेज › Kolhapur › महापुराची ‘यूएन’कडून दखल!

महापुराची ‘यूएन’कडून दखल!

Last Updated: Jan 04 2020 1:12AM
कोल्हापूर : सुनील कदम

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गेल्यावर्षी आलेल्या प्रलयंकारी महापुराची दखल आता संयुक्‍त राष्ट्रांनी (यूएन) घेतली आहे. भविष्यात या दोन जिल्ह्यांत महापुराची आपत्ती उद्भवल्यास आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची सूचना संयुक्‍त राष्ट्रांनी जपानला केली आहे. त्यानुसार काही स्थानिक अधिकार्‍यांच्या  सहभागातून रविवारपासून या आराखड्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

संयुक्‍त राष्ट्रांच्या 2015 साली झालेल्या आमसभेत जगभरात उद्भवणार्‍या नैसर्गिक आपत्तींबाबत व्यापक चर्चा झाली होती. या चर्चेच्या अनुषंगाने अशा नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रत्येक देशनिहाय आणि आपत्तीनिहाय सुरक्षा कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जगाच्या पाठीवर नैसर्गिक आपत्तींना सर्वाधिक तोंड द्यावे लागते ते जपान या देशाला. भूकंप आणि त्सुनामी अशासारख्या नैसर्गिक आपत्ती जणू काही जपानच्या पाचवीला पुजलेल्या आहेत. मात्र या नैसर्गिक आपत्तींची जपानला फार काही झळ सोसावी लागत नाही. कारण, या देशाने नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी विकसित केलेला सुरक्षा आराखडा. जपानच्या या सुरक्षा आराखड्यामुळे त्या देशाने आजपर्यंत तशा शेकडो नैसर्गिक आपत्तींचा कोणतेही नुकसान होऊ न देता यशस्वीपणे मुकाबला केलेला आहे.

जपानचा हा अनुभव विचारात घेऊन संयुक्‍त राष्ट्रांनी जगभरातील नैसर्गिक आपत्तींचा धोका असलेल्या  देशासाठी अशा पद्धतीचा सुरक्षा आराखडा तयार करण्याची जबाबदारी जपानवर सोपविलेली आहे. 2030 पर्यंत जगभरातील बहुतेक देशांसाठी जपानकडून अशा पद्धतीचा सुरक्षा आराखडा तयार करून दिला जाणार आहे. गेल्यावर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात प्रलयंकारी महापुराने तांडव घातले. जवळपास पंधरा दिवसांच्या या महापुरामुळे या दोन जिल्ह्यांतील शेती आणि मालमत्तांचे मिळून हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले, हजारो जनावरांचा आणि जवळपास शंभरभर लोकांचाही त्यात बळी गेला. हजारो कुटुंबांची अक्षरश: वाताहत झाली, शेकडो कुटुंबे देशोधडीला लागली. संपूर्ण राज्यआणि देशाचे लक्ष या महापुराकडे वेधले गेले होते.

आता संयुक्‍त राष्ट्रांनीच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील या महापुराची दखल घेतली आहे. भविष्यात या दोन जिल्ह्यांत अशा प्रकारची नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्याची सूचना संयुक्‍त राष्ट्रांनी जपानला केली आहे. काही स्थानिक तंत्रज्ञांच्या सहकार्याने जपानमधील सुरक्षा आराखडा निर्मिती पथक हा आराखडा तयार करून देणार आहे. केंद्र शासनाने या पथकामध्ये विशेष अधिकारी म्हणून पुण्यातील जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांची नियुक्‍ती केली आहे. त्यांच्या सहाय्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या आणि महापालिकेच्या काही अधिकार्‍यांचा व काही समाजसेवकांचा यामध्ये समावेश आहे. आराखडा निर्मितीचे हे काम प्रत्यक्ष जपानमध्येच दि. 6 जानेवारी ते 22 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या आराखड्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अंतिम मान्यतेसाठी तो संयुक्‍त राष्ट्रांच्या तज्ज्ञ समितीकडे सोपवून त्यांची अंतिम मान्यता घेतली जाणार आहे. त्यांच्या मान्यतेनंतर या आराखड्याला अंतिम स्वरूप येऊन त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरुवात होणार आहे. एकूणच प्रत्यक्ष संयुक्‍त राष्ट्रांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील महापुराची दखल घेतल्यामुळे हा महापूर किती भयावह होता, ते पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.