Tue, Aug 04, 2020 21:53होमपेज › Kolhapur › कोल्हापूरच्या विमानसेवेचा होणार विस्तार, पर्यटनवाढीला चालना

अहमदाबाद, गोव्यालाही विमानसेवा शक्य

Published On: Jun 17 2019 2:09AM | Last Updated: Jun 17 2019 2:09AM
उजळाईवाडी : दौलत कांबळे

कोल्हापूर येथून इंडिगोची अहमदाबादला तर एअर इंडिया (अलायन्स एअर)ची गोव्याला विमानसेवा जुलैअखेर सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी कंपनीकडून चाचपणी सुरू आहे. यामुळे कोल्हापूर हे मुंबई, पुण्यानंतर औद्योगिक, पर्यटन व व्यावसायिदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.

केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेंतर्गत अलायन्स एअरची 9 डिसेंबर 2018 पासून कोल्हापूर-हैदराबाद व कोल्हापूर-बंगळूर विमानसेवा सुरू झाली. त्यापाठोपाठ इंडिगोची कोल्हापूर-तिरूपती व कोल्हापूर-हैदराबाद विमानसेवा 12 मे 2019 पासून सुरू झाली. या विमानसेवेला कोल्हापूरकरांकडून चांगला प्रतिसाद लाभत असून, दररोज 400 हून अधिक प्रवासी कोल्हापूर- तिरूपती, बंगळूर, हैदराबादला ये-जा करत आहेत.

या वाढत्या प्रवाशांमुळे इंडिगोची कोल्हापूर-अहमदाबाद सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूरच्या व्यापारी व उद्योजकांकडून यासाठी जोरदार मागणी होत आहे. माजी नागरी हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे उद्योजकांनी मागणी केली होती. विद्यमान केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री हरदीप एस. पुरी यांनी कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा सुरू करण्यासाठी सकारात्मक विचार करू, अशी ग्वाही दिल्याने व विमान कंपनीची अहमदाबाद सेवा पुरवण्याची असलेली तयारी  पाहता, लवकरच ही सेवा सुरू होण्याच्या मार्गावर आहे.         

त्याचबरोबर कोल्हापुरातून गोव्याला अलायन्स एअर कंपनी विमानसेवा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. एप्रिल 2018 मध्ये उड्डाण-1 मध्ये सुरू झालेली कोल्हापूर - मुंबई विमानसेवा एअर डेक्‍कन तोट्यात आल्याने खंडित झाली होती. ही सेवादेखील ट्रूजेट विमान कंपनीकडून सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, याचा स्लॉट लवकरच मिळण्याची शक्यता आहे.

राज्य शासनाने विमानतळ विस्तारीकरणातील त्रुटी दूर करणे गरजेचे आहे. नाईट लँडिंगचे काम 15 जुलैपर्यंत झाल्यास अनेक कंपन्या कोल्हापूरला विमानसेवा देण्यास तयार आहेत. - कमलकुमार कटारिया, विमानतळ संचालक