Sat, Jul 04, 2020 01:50होमपेज › Kolhapur › कोल्हापूर विमानतळास राजाराम महाराजांचे नाव

कोल्हापूर विमानतळास राजाराम महाराजांचे नाव

Published On: Jan 17 2018 12:36PM | Last Updated: Jan 17 2018 12:36PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

कोल्हापूरच्या विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव देण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात येत होती. शहरातील विविध संस्था संघटनांनी यासाठी सरकारकडे पत्रे आणि निवेदने पाठविली होती. या मागणीला अखेर यश आले असून, आता विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्याचे निश्चित झाले आहे. या निर्णयाचे कोल्हापुरात जोरदार स्वागत होत असून, कोल्हापूर जिल्हा भाजपच्या वतीनेही व्हिनस कॉर्नर येथे छत्रपती राजाराम महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून साखर वाटप करण्यात येत आहे. 

मुळात कोल्हापुरात विमानसेवा सुरू करण्यात छत्रपती राजाराम महाराजांचे योगदान आहे. त्यांनी १९३९मध्ये कोल्हापुरात विमानसेवा सुरू केली होती. त्यामुळेच विमानतळाला राजाराम महाराजाचे नाव देण्याची मागणी होत होती. गेली १८ वर्षे  शहरातील विविध संस्था संघटना यासाठी मागणी करत होत्या. राजारामपुरी व्यापारी असोसिएशनकडूनही सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत होता. 

त्यामुळे सरकारच्या निर्णायाची माहिती मिळताच राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज, व्हिनस कॉर्नर येथील छत्रपती राजाराम महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पेढे वाटून आनंद साजरा केला. व्यापारी असोसिएशनचे आणि कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी या निर्णयाबद्दल सरकारचे अभिनंदन केले आहे. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष रणजीत पारेख, सचिव रमेश कार्वेकर, संचालक अनिल पिंजानी, आशिष पाटुकले , राजेंद्र शहा, अमित लोंढे आदी उपस्थित होते.

दरम्यान, कोल्हापूर विमानसेवा गेल्या काही वर्षांपासून बंद आहे. केंद्र सरकारच्या उडाण योजनेत कोल्हापूरचा समावेश झाला असून, त्या माध्यमातून कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू होण्याच्या हालचाली सुरू असल्याने कोल्हापूरकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक विकासासाठी विमानसेवा अत्यंत गरजेची असल्याने त्यासाठी विविध स्तरांवर पाठपुरावा सुरू आहे. कोल्हापूर मुंबईबरोबरच कोल्हापूर-तिरूपती, कोल्हापूर-हैदराबाद, कोल्हापूर-बेंगळुरू  विमानसेवा सुरू करण्याचीही चर्चा सुरू आहे.