Mon, Jun 01, 2020 05:45होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : गाईच्या दूध खरेदी दरात दोन रुपयांची कपात

गाईच्या दूध खरेदी दरात दोन रुपयांची कपात

Last Updated: Apr 02 2020 8:03PM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गाईच्या दूध खरेदी दरात १ एप्रिलपासून दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. गोकुळ दूध संघाकडे सध्या रोज सरासरी सहा लाख लिटर गाईचे दूध जमा होते. यातील दोन ते अडीच लाख लिटर दुधाचीच विक्री होते. उर्वरित दूध शिल्लक रहात असून त्याची पावडर केली जाते. त्यामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी संघाने हा निर्णय घेतल्याची माहिती पत्रकाव्दारे दिली आहे.

सध्‍या ‘कोरोना’ विषाणूंमुळे सर्वच ठिकाणी दूध विक्रीमध्‍ये घट झालेली आहे. त्‍यामुळे गोकुळ दूध संघाचीही दूध विक्री घटलेली आहे. गाईचे आणि म्हैशीचे मिळून सुमारे सहा लाख लिटर दूध शिल्लक राहते. यात गाईचे दूध शिल्लक राहण्याचे प्रमाण अधिक आहे. दुधाची पावडर करताना संघाला साधारण लिटरमागे दोन अडीच रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यामुळे दूध खरेदी दरात कपात करण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. सध्‍या गाईच्‍या दुधास ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफसाठी २९ रुपये प्रतिलिटर इतका दर आहे. तो १ एप्रिलपासून प्रतिलिटर २७ रुपये इतका करण्यात आला आहे.