महिला टोळीची शहर, उपनगरात दहशत

Last Updated: Aug 09 2020 12:47AM
Responsive image


कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

शिकाळीसह अन्य तत्सम वस्तू विक्रीच्या बहाण्याने टोळके करून वावरणार्‍या काही महिलांनी शहर, उपनगरात दहशत निर्माण केली आहे. निर्जन परिसरात वाहनधारक, टपरी स्टॉल, तरुणांना एकाकी गाठून लुटमारीचा सपाटा लावल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी सकाळी रिंगरोड परिसरात किराणा दुकानदारासह कॉलेज तरुणाला मारहाण करून पैसे काढून घेतल्याचा प्रकार घडला.
लॉकडाऊन काळात फिरस्त्या महिलांचा मध्यवर्ती परिसरासह उपनगरात वावर वाढला आहे. शिकाळीसह अन्य तत्सम वस्तू विक्रीच्या बहाण्याने महिला थेट घरात घुसतात. वस्तू घेण्यासाठी गळ घालतात. घरातील प्रमुखांनी नकार दिल्यास वादावादी, प्रसंगी आरडा-ओरड करून गर्दी जमवितात. वस्तू घेऊनही पैसे देण्यास संबंधित नकार देत असल्याचा कांगावा करतात. एकाचवेळी सर्व महिला अंगावर धावून जातात.

निर्जन मार्गावरील हॉटेल्स, चहाची टपरी, किराणा दुकानदार, एकेकट्या दुचाकीस्वारांना गाठून त्याच्यावर दहशत निर्माण करून लुबाडण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत.दरम्यान, हिंदू युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अशोक देसाई यांच्यासह कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळपासून महिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या रिंगरोड येथून पसार झाल्या. दहशत माजवत लुबाडणूक करणार्‍या टोळीविरुद्ध तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.