Thu, Jun 24, 2021 10:39होमपेज › Kolhapur › व्यसनाविरोधात ८५० शाळांतील अडीच लाख विद्यार्थी रस्त्यावर...

व्यसनाविरोधात ८५० शाळांतील अडीच लाख विद्यार्थी रस्त्यावर...

Published On: Dec 31 2017 1:51AM | Last Updated: Dec 31 2017 1:23AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी 

देशाचे भविष्य असणारी आजची युवा पिढी विविध प्रकारच्या व्यसनांनी ग्रासली आहे. अशा घातक व्यसनाविरोधात जिल्ह्यातील 850 शाळांतील सुमारे अडीच लाख विद्यार्थी 5 जानेवारी रोजी रस्त्यावर उतरणार आहेत. जनस्वास्थ्य अभियानांतर्गत 1 ते 5 जानेवारी या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष दीपक देवलापूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. आरोग्य, पर्यावरण आणि वैज्ञानिक दृष्टीकोन याबाबत विद्यार्थ्यांसह समाजात जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने जनस्वास्थ्य दक्षता समितीतर्फे प्रतिवर्षी या अभियानाचे आयोजन केले जाते. यंदा या उपक्रमाचे 17 वे वर्ष आहे. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ, माध्यमिक शिक्षण विभाग, आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम होणार  आहे. 

1 ते 5 जानेवारी या कालावधीत शाळेतील प्रार्थनेवेळी जनस्वास्थ्य प्रतिज्ञा होईल. 2 जानेवारी रोजी शालेय परिसरात स्वच्छता अभियान राबविले जाईल. यावेळी विद्यार्थ्यांना कचर्‍यापासून खत निर्मिती, सांडपाणी पुनर्वापर, सौर ऊर्जेचा वापर, टाकाऊ अन्नपदार्थांपासून बायोगॅस निर्मिती, रेनवॉटर हार्वेस्टिंग, प्रदूषण नियंत्रण, वाहतुकीचे नियम अशा विविध विषयांवर मार्गदर्शन होईल. 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंतीसह विद्यार्थ्यांना लैंगिक समस्या विषयावर मार्गदर्शन होईल.4 जानेवारी रोजी कुष्ठरोग, क्षयरोग, एड्स, डेंग्यू, मलेरिया, मधुमेह, हृदयरोग आदी गंभीर आजारांबाबत घेण्याची दक्षता या विषयावर मार्गदर्शन होईल. 

5 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता, गुटखा, तंबाखू, दारू व धुम्रपानविरोधी मानवी साखळी होणार आहे. यात सहभागी होणार्‍यांनी अधिक माहितीसाठी जनस्वास्थ्य दक्षता समिती, द्वारा दलित मित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालय साईक्स एक्स्टेंशन येथे संपर्क साधण्याचे आवाहन देवलापूरकर यांनी केले. यावेळी बृहस्पती शिंदे, ओंकार पाटील, मिनार देवलापूरकर, सुधीर हंजे, प्रभाकर मायदवे, साक्षी शिंदे, अक्षरा इनामदार, श्रृती हिंगे, संजीव कुलकर्णी, गौरांग इंगवले आदी उपस्थित होते.