होमपेज › Kolhapur › कोरोना तपासणीसाठी अत्याधुनिक केबिन

कोरोना तपासणीसाठी अत्याधुनिक केबिन

Last Updated: Apr 28 2020 11:54PM
कोल्हापूर : राजेंद्र जोशी

कोल्हापुरातील एका तरुणाने पीपीई किट्सशिवाय रुग्णाचे स्वॅब टेस्टिंगपासून ते तपासणीपर्यंत संरक्षण देणार्‍या अत्याधुनिक केबिनची निर्मिती केली आहे. या केबिनमुळे रुग्णालयात कोरोना संसर्गाच्या फैलावाला आळा घालता येणे शक्य आहे. तसे तपासणीसाठी लागणार्‍या डॉक्टरांच्या पीपीई किट्सच्या खर्चातही मोठ्या प्रमाणात कपात होऊ शकेल, असा दावा या तरुण संशोधक डॉक्टरांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना केला. 

डॉ. विश्वराज बाळासाहेब शिंदे असे या तरुण संशोधक डॉक्टरांचे नाव आहे. रशियात वैद्यकीय अभ्यासक्रमाची पदवी संपादन केली. अमेरिकेत न्यूयॉर्क विद्यापीठाच्या वॉशिंग्टन स्क्वेअर कॅम्पसमध्ये सार्वजनिक आरोग्य या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉ. शिंदे यांनी जागतिक आरोग्य संघटनेत काही काळ उमेदवारी केली. डॉ. शिंदे वर्षाभरापूर्वीच कोल्हापुरात परतले. कोरोनाच्या संसर्गानंतर अस्वस्थ झालेल्या या तरुणाने जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनाचा अभ्यास करत केबिनची निर्मिती केली. यापैकी पहिले केबिन सांगलीत कार्यान्वित झाले आहे. तर दुसरे केबिन कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात बसविण्याच्या अंतिम तयारीत आहे. डॉ. शिंदे हे कोल्हापूर जिल्हा नियोजन विकास मंडळाचे निवृत्त अधिकारी बाळासाहेब शिंदे यांचे चिरंजीव आहेत.

डॉ. शिंदे यांनी बनविलेले हे अत्याधुनिक स्वॅब टेस्टिंग केबिन चार फूट बाय चार फूट आकाराचे असून नऊ फूट उंचीचे आहे. या केबिनमध्ये बसून तपासणीसाठी डॉक्टरांचा हात बाहेर येण्याकरिता 6 इंच व्यासाचे एक छिद्र ठेवण्यात आले आहे. या छिद्रातून नायट्राईल ग्लोजचा वापर करून डॉक्टर केबिन बाहेरील रुग्णाची तपासणी करू शकतात. ब्ल्यू टूथ स्टेथेस्कोपची जोड देऊन थेट रुग्णाची तपासणी करता येते. शिवाय, टेंपरेजर गनमुळे रुग्णाचे तापमानही कळू शकते. या केबिनमध्ये आत तपासणी करणार्‍या डॉक्टरांना संसर्गापासून मुक्त ठेवण्याकरिता अतिनील किरण (यू.व्ही.) देणारी लाईट व्यवस्था बसविण्यात आली असून हेप्पा फिल्टर्स व रेडियन फॅन्समुळे आतील वातावरण निर्जंतुक राहण्यास मदत होते आहे.