खासगी रुग्णालयांनी शासकीय दर आकारावेत; अन्यथा कारवाई

Last Updated: Aug 09 2020 1:28AM
Responsive image
file photo


कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

काही खासगी दवाखाने जास्त बिल आकारणी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. दोन लाख 45 हजारांचे बिल आम्ही तपासणीनंतर 85 हजार केले आहे. यापुढे खासगी दवाखान्यांनी कोरोना रुग्णांना जास्त बिल आकारणी केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्‍त डॉ. मल्‍लिनाथ कलशेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. 

डॉ. कलशेट्टी म्हणाले, शहरातील 30 दवाखाने आणि सीपीआर, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. खासगी रुग्णालयांसाठी मुख्य लेखापालांच्या मार्गदर्शनाखाली लेखापाल नेमले आहेत. बिलांची तपासणी केली जाते. बुधवारी एका प्रकरणात दोन लाख 45 हजारांच्या बिलाची तपासणी केली असता 85 हजार रुपये झाले. यापूर्वीही सहा प्रकरणांत  तपासणी करून बिल कमी केले आहे. खासगी रुग्णालयांनी शासकीय दर आकारावेत,  सुरुवातीला बिल वाढविण्याचा प्रकार जास्त आहे. सध्या हे प्रमाण कमी होत आहे.  जी रुग्णालये जास्त दर आकारतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. या परिस्थितीत दवाखान्यांनी कोरोना व बिगर कोरोना रुग्णांना तत्काळ दाखल करून बेड उपलब्ध करून द्यावेत. नंतर इतरत्र शिफ्ट करण्यासाठी एकमेकांच्या सहकार्यातून प्रयत्न करूया. यासाठी जिल्हा प्रशासन आणि महापालिका खासगी रुग्णालयांना मदत करेल. 

आयुक्‍त म्हणाले, पीपीई किट औषधे यांचे जास्त पैसे आकारतात. जादा पीपीई किट वापरले जाते. अनेक दवाखान्यांनी शासकीय दराने उपचारास मान्यता दिली आहे. सर्व रुग्णालयांना लेखी पत्र दिले आहे. काही रुग्णालयांना जास्त बेड उपलब्ध करण्याची सूचना केली आहे. काही रुग्णालयांशी मी सतत बोलत आहे.  शहरात उपचाराविना कोणाचा मृत्यू होता कामा नये याची प्रत्येकांनी काळजी घ्यावी. यासाठी खासगी दवाखान्यांना काही मदत लागल्यास जिल्हा प्रशासन व महापालिका निश्‍चित मदत करेल.