Fri, Nov 27, 2020 23:05होमपेज › Kolhapur › शहीद जवान संग्राम पाटील यांच्यावर उद्या जन्मगावी होणार अंत्‍यसंस्‍कार 

शहीद जवान संग्राम पाटील यांच्यावर उद्या जन्मगावी होणार अंत्‍यसंस्‍कार 

Last Updated: Nov 22 2020 7:22PM
निगवे खालसा : पुढारी वृत्तसेवा 

शनिवारी पहाटे जम्मू काश्मीर मधील राजौरी येथील नौसेरा बॉर्डरवर पाकिस्तानी सैनिकांशी झालेल्या चकमकीत निगवे खालसा येथील बहादुर वीर जवान हवालदार संग्राम शिवाजी पाटील (वय. ३७) यांना वीर मरण आले होते. दरम्‍यान निगवे खालसा येथील चनिशेटी विद्यालयाच्या समोर असलेल्या भव्य क्रीडा मैदानात शहीद जवान संग्राम पाटील यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात येणार आहेत. यांच्या अंत्य संस्काराची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. 

त्यासाठी ६ मीटर बाय १२ मीटरचा चबुतरा उभारण्यात आला असून, त्याच्या शेजारीच व्हीआयपींसाठी  व त्यांच्या कुटुबियांसाठी मंडप ( शामियाना) उभारण्यात आला आहे. स्त्री आणि पुरूष यांची स्वतंत्र व्यवस्था मैदानावर करण्यात आली आहे.

गावातील तरुण, तरुण मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ, ग्रामपंचायत, महसूल प्रशासन, पोलिस, मिलिटरीचे आजी माझी सैनिक या कामी लागले असून, अंत्य विधीसाठी लागणारी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यापासून गावात येईपर्यंत सर्व ठिकाणी पाकिस्तानचा निषेध करणारे वीर जवान अमर रहे च्या घोषणा असणारे संग्राम शिवाजी पाटील यांचे छायाचित्र असणारे मोठे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. त्यामुळे वातावरण देशभक्तीमय झाले आहे. गावात आजही लोकांनी उत्स्फूर्त पणे बंद पाळला आहे.

प्रांताधिकरी वैभव नावडकर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक तिरुपती काकडे, यांची निगवे खालसा गावाला भेट

दरम्यान अंत्यविधीला ३० ते ३५ हजार चा जन समुदाय उपस्थित राहील असा अंदाज व्यक्त होत असून, त्याची तयारीची पाहणी करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, करवीरचे पोलिस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर, तहसीलदार शितल भांबुरे मुळे आणि सहाय्यक पोलिस उप निरीक्षक सरोजिनी चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन अंत्य विधीच्या तयारीची माहिती घेऊन सूचना केल्या.

 प्रांत नावडकर यांनी सर्वांना मास्क वापरण्याची विनंती करावी गर्दीवर नियंत्रण ठेवावे. असे सांगून नागरिकांनी संयम व धीर राखण्याचे आवाहन केले. अति. पोलिस अधिक्षक काकडे यांनी मुख्य रस्त्यावर कोणीही वाहने पार्किंग करू नये, गर्दी करू नये. असे सांगून गावात मराठी शाळा, मैदान, गावलाठ येथे केलेल्या पार्किंग व्यवस्थेची पाहणी केली.

याच बरोबर दिवसभरात जि. प. सदस्य अर्जुन आबिटकर, जिल्हा आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत हांडे सचिव बी. जी. पाटील चुयेकर आदींनी भेट दिली. यावेळी उपसभापती सागर पाटील, सरपंच पांडुरंग महाडेश्वर, उपसरपंच गोंगणे, सुमित चौगले, सदाशिव पाटील, डॉ. टी वाय पाटील सर्व ग्रा. प. सदस्य तुषार पाटील, बाजीराव पाटील, गावातील सर्व तरुण मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामस्थांकडून या कामी पुढे येत आहे. 

 संग्राम यांचे पार्थिव सोमवारी सकाळी ७.३० वाजता गावी पोहचणार

वीर जवान संग्राम यांचे पार्थिव थेट जम्मू काश्मीर वरून सकाळी आणण्यात आले असून, ते विमानाने सायंकाळी पुण्यात दाखल झाले आहे. रात्री उशिरापर्यंत कोल्हापुरात पोहचणार आहे. कोल्हापुरातून सकाळी ७.३० पर्यंत निगवे खालसा येथे पोहचणार आहे. त्यानंतर अंत्य यात्रेला सुरुवात होईल.

मास्क वापरण्याचे आवाहन 

कोरोना संकट पुन्हा डोके वर काढत असल्याने जिल्ह्यात  कोरोनाग्रस्‍तांची संख्या पुन्हा  वाढत आहे. यामुळे गर्दी टाळून सर्वांनी मास्क वापरण्याचे आवाहन आरोग्य खात्या मार्फत करण्यात आले आहे.