Thu, Jan 28, 2021 08:12होमपेज › Kolhapur › कोल्हापूर-मुंबई विमानसेवा २४ डिसेंबरपासून

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा २४ डिसेंबरपासून

Published On: Dec 14 2017 2:18AM | Last Updated: Dec 14 2017 2:03AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

येथील उजळाईवाडी विमानतळावरून मुंबईसाठी विमानसेवा 24 डिसेंबरपासून सुरू होत आहे. आठवड्यातून मंगळवार, बुधवार व रविवारी ही सेवा उपलब्ध असेल. मुंबईहून कोल्हापूरला दुपारी सव्वा वाजता विमान निघून ते अडीच वाजता पोहोचेल आणि कोल्हापूरहून दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी निघून हेच विमान चार वाजून चाळीस मिनिटांनी मुंबईत उतरेल. केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेतून ही सेवा उपलब्ध होत आहे. आपण सातत्याने केलेल्या प्रयत्नांची ही फलनिष्पत्ती असल्याचे पत्रक खा. धनंजय महाडिक व खा. संभाजीराजे यांनी प्रसिद्धीला दिले आहे.

एअर डेक्‍कन कंपनीने ही विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्याच्या तिकीट बुकिंगला गुरुवारी (दि. 21) प्रारंभ होत आहे. विमानसेवा सुरू होत असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील व एअर डेक्‍कनच्या अधिकार्‍यांनी बुधवारी दिली. गेली सहा वर्षे कोल्हापूर-मुंबई विमानसेवा बंद होती. ही सेवा पूर्ववत सुरू होण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. छोटी शहरे विमानसेवेने जोडण्याच्या केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेची घोषणा झाल्यानंतर त्यात कोल्हापूरचा समावेश करण्यात आला. त्यानंतरही वाहतूक परवाना आणि मुंबई विमानतळावरील वेळापत्रक (स्लॉट) मिळण्यासाठी विलंब होत राहिला. त्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांना निवेदन देण्यात आले होते. त्यांच्या आदेशानुसार भारतीय विमानतळ प्राधिकरण व नागरी उड्डाण संचालनायलयाने ऑक्टोबरमध्ये उजळाईवाडी विमानतळाची संयुक्‍त पाहणी केली होती.

तीन वर्षे पाठपुरावा : खा. महाडिक

खा. धनंजय महाडिक यांनी म्हटले आहे की, विमानसेवा सुरू होण्यासाठी गेली तीन वर्षे आपण पाठपुरावा केला. वेळोवेळी लोकसभेत आवाज उठवला हक्‍कभंगाचा ठराव आणण्याचा इशाराही दिला. सातत्याने बैठका घेऊन या विषयाचा पाठपुरावा केला. ना. अशोक गजपती राजू यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचेही सहकार्य लाभले. विमानसेवेअभावी पर्यटन, व्यापार, उद्योगाला फटका बसत असल्याचे निदर्शनाला आणून सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. विमानतळाच्या संरक्षक भिंतीसाठीही निधी उपलब्ध केला. 16 डिसेंबरला कोल्हापूर विमानतळाला डे ऑपरेटिंग परवाना मिळणार असल्याची माहितीही खा. महाडिक यांनी दिली.

लक्ष वेधले होते : खा. संभाजीराजे

याबाबत खा. संभाजीराजे यांनी म्हटले आहे की, रखडलेल्या कोल्हापूर-मुंबई विमानसेवेबाबत आपण ना. अशोक गजपती राजू यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतरच विमानतळ सुधारणा आणि सेवेबाबत गतीने हालचाली झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि ना. राजू यांचे कोल्हापूरकरांच्या वतीने आभार मानले असून सेवा अखंडित सुरू राहण्याबाबत सहकार्याची अपेक्षा केली आहे.