Thu, Sep 24, 2020 17:40होमपेज › Kolhapur › नवीन वर्षातच मुहूर्त मिळण्याची शक्यता

विमानसेवा लांबणीवर

Published On: Dec 21 2017 1:53AM | Last Updated: Dec 21 2017 12:49AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा अनिश्‍चित काळासाठी लांबणीवर पडली आहे. ही विमानसेवा रविवारपासून सुरू होणार असल्याचे सांगितले जात होतेे. मात्र, आता तब्बल सहा वर्षांनंतर सुरू होणार्‍या या विमानसेवेला नव्या वषार्र्त मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. या मार्गावर सेवा देणार्‍या एअर डेक्‍कन या कंपनीने सहा दिवस सेवा सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. त्याला नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून अद्याप ग्रीन सिग्‍नल दिला नाही. यामुळे बुधवारी होणारी तांत्रिक चाचणीही झाली नाही.

केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेंतर्गत एअर डेक्‍कन कंपनीकडून कोल्हापूर-मुंबई या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. रविवार दि.24 पासून ही सेवा सुरू होईल, असे केंद्र शासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. विमानसेवेसाठी आवश्यक डे-ऑपरेटिंग परवानाही कोल्हापूर विमानतळाला देण्यात आला होता. आज विमानाची तांत्रिक  चाचणीही घेण्यात येणार होती. मात्र, कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा रविवार, मंगळवार आणि बुधवार अशी आठवड्यातून तीनच दिवस सुरू राहणार आहे, त्यासह या विमानसेवेसाठी दुपारचा स्लॉट मिळालेला आहे. दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी विमान मुंबईहून निघेल आणि कोल्हापुरात 2 वाजून 30 मिनिटांनी पोहोचेल. कोल्हापूर येथून दुपारी 3 वाजून 25 मिनिटांनी विमानाचे टेक ऑफ होणार असून दुपारी 4.40 वाजता मुंबईत त्याचे लँडिंग होणार आहे.

आठवड्यातून तीन दिवस आणि मिळालेला दुपारचा स्लॉट, गैरसोयीचा ठरणारा आहे. यामुळे विमानसेवा सुरळीत राहण्याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले. या मार्गावर किमान सहा दिवस विमानसेवेसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी कंपनीने नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे सोमवारी केली. याबाबत काहीच निर्णय न झाल्याने रविवारपासून सुरू होणार्‍या विमानसेवेचा मुहूर्त लांबल्याचे स्पष्ट झाले.

कोल्हापूर-मुंबई मार्गावर जादा तीन स्लॉट देणे सध्या अशक्य असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. मात्र, सहा दिवस सेवा आणि सकाळच्या सत्रातील स्लॉट मिळण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे अधिकार्‍यांनी सांगितले. हा निर्णय होईपर्यंत आठवड्यातील तीन दिवस सुरू राहणारी विमानसेवा सुरू करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

विमानसेवेबाबत आज झालेल्या बैठकीत ठोस निर्णय झाला नाही. यामुळे रविवारपासून सुरू होणारी विमानसेवा लांबल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत निर्णय झाल्यानंतर विमानसेवा सुरू होण्यास आणखी आठ-दहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यामुळे विमानसेवेला नव्या वर्षातच मुहूर्त मिळण्याची शक्यता व्यक्‍त केली जात आहे.