होमपेज › Kolhapur › प्रदूषणाला कोल्हापूर-इचलकरंजी सर्वाधिक जबाबदार!

प्रदूषणाला कोल्हापूर-इचलकरंजी सर्वाधिक जबाबदार!

Published On: Jun 06 2018 1:42AM | Last Updated: Jun 06 2018 12:01AMकोल्हापूर : सुनील कदम

उगमापासूनच प्रदूषणाचा शाप लागलेल्या पंचगंगेला पुढे पूर्ण विषारी बनविण्याचे काम कोल्हापूर आणि इचलकरंजी या दोन शहरांमुळे होते. या दोन शहरांमधील बहुतेक सगळे सांडपाणी विनाप्रक्रिया नदीपात्रात सोडले जात असल्यामुळे पंचगंगेला आजची अवकळा प्राप्त झालेली आहे. त्यामुळे या दोन शहरांमधील सांडपाण्याच्या बाबतीत कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर महापालिका आणि इचलकरंजी नगरपालिकेला शहरातील थेंब आणि थेंब सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सक्‍ती करण्याची आवश्यकता आहे. एवढे केले तरी पंचगंगेचे निम्म्याहून अधिक प्रदूषण कमी होईल.

राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या अहवालानुसार पंचगंगेच्या प्रदूषणाला 53 टक्के कोल्हापूर महापालिका आणि 22 टक्के इचलकरंजी नगरपालिका कारणीभूत आहे. याचा अर्थ नदीच्या 75 टक्के शहराला ही दोन शहरेच प्रामुख्याने कारणीभूत आहेत. प्रदूषणाच्या उर्वरित 25 टक्क्यांमध्ये नदीकाठची 174 गावे, साखर कारखाने, औद्योगिक वसाहती वगैरे येतात. यावरून पंचगंगा प्रदूषणात या दोन शहरांचा सहभाग किती मोठा आहे, ते समजून येण्यास हरकत नाही. कोल्हापूर शहरातून दररोज 100 दशलक्ष लिटर आणि इचलकरंजी शहरातून दररोज 38 दशलक्ष लिटर वेगवेगळ्या प्रकारचे सांडपाणी पंचगंगेत मिसळून नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते, त्यामुळे या दोन शहरांमधून नदीत मिसळणार्‍या सांडपाण्यावर कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. कोल्हापूर महापालिका आणि नगरपालिकेने काही प्रमाणात सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा उभा केली असली तरी नदीचे प्रदूषण रोखण्याइतक्या या यंत्रणा सक्षम नाहीत.

कोल्हापूर आणि इचलकरंजी या दोन शहरांचा गेल्या काही वर्षांत आरोग्यविषयक सोयी-सुविधांच्या बाबतीत मोठा विकास झाला आहे. मात्र, या दोन शहरांमधील दवाखानेसुद्धा पंचगंगेच्या प्रदूषणाला मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत. कोल्हापूर शहरात 3 शासकीय, 3 निमशासकीय आणि नोंदणीकृत 493 खासगी दवाखाने आहेत. इचलकरंजी शहरात 2 शासकीय आणि 208 खासगी दवाखाने आहेत. याशिवाय दोन्ही शहरांमध्ये मिळून जवळपास 40 वैद्यकीय प्रयोगशाळा आहेत. या सगळ्या दवाखान्यांमध्ये मिळून प्रतिदिन जवळपास पाच हजारहून अधिक रुग्णांवर उपचार केले जातात. या रुग्णांच्या मलमुत्रांमधून वेगवेगळ्या रोगांना कारणीभूत ठरणारे घटक बाहेर पडत असतात. या घटकांमधून सातत्याने वेगवेगळ्या रोगांचे जीवाणू-विषाणू बाहेर पडत असल्याने रुग्णालयांमधील सांडपाणी हे मानवी आरोग्याच्या द‍ृष्टीने अतिशय धोकादायक समजले जाते. कोल्हापूर शहरातील रुग्णालयांमधून दररोज 1 लाख लिटर आणि इचलकरंजी शहरातील रुग्णालयांमधून दररोज 50 हजार लिटर सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळले जाते. याशिवाय एकट्या सीपीआरमधून दिवसाला 2 लाख 50 हजार लिटर सांडपाणी 

हॉटेल्स, खानावळी प्रदूषणाला कारणीभूत

हॉटेल आणि खानावळींमुळे होणारे नदीचे प्रदूषण हा एक स्वतंत्र आणि चिंताजनक विषय आहे. कोल्हापूर शहरात 894 हॉटेल्स असून 600 हून अधिक फिरते विक्रेते हॉटेल व्यवसाय करताना दिसतात. इचलकरंजी शहरात 150 मोठी हॉटेल्स आणि 376 फिरते हॉटेल व्यावसायिक आहेत. याशिवाय दोन्ही शहरांमध्ये नोंदणीकृत आणि बिगर नोंदणीकृत खानावळींची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. ही हॉटेल्स आणि खानावळी यामधील सांडपाणी पंचगंगेच्या प्रदूषणाला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे किमान काही मोठ्या हॉटेल्सना तरी सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा सक्‍तीची करण्याची आवश्यकता भासत आहे. या सगळ्या बाबी विचारात घेता पंचगंगेच्या प्रदूषणाला कोल्हापूर आणि इचलकरंजी ही दोन शहरे किती मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत, त्याचा प्रत्यय येण्यास हरकत नाही. त्यामुळे या दोन शहरांच्या प्रदूषणाला आळा घालण्याची गरज आहे.