अंत्यसंस्कारानंतर दुसर्‍या दिवशीच रक्षाविसर्जन करा

Last Updated: Aug 09 2020 1:02AM
Responsive image


कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

 पंचगंगा स्मशानभूमीत दुरुस्तीचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्यामुळे 40 पैकी 20 बेड उपलब्ध होत आहेत. कोरोनासाठीही स्वतंत्र बेड आहेत. यादरम्यान अपुर्‍या बेडमुळे मृतदेहांवर इतर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. पंचगंगा स्मशानभूमीत अपुरी जागा असल्याने गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर रक्षाविसर्जन मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत दुसर्‍या दिवशी करावे, असे आवाहन महापौर निलोफर आजरेकर व सर्वपक्षीय कृती समितीने केले आहे. 

गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा धोका

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्‍तीवर स्वतंत्र ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातात. स्मशानभूमीचे काम सुरू असल्याने अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा धोका होऊ शकतो. अंत्यसंस्कारानंतर दुसर्‍याच दिवशी रक्षाविसर्जन करावे. नागरी कृती समितीचे अशोक पोवार म्हणाले, वाहनांची गर्दी होत असल्याने स्मशानभूमीकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावर सकाळी 7 ते 12 पर्यंत एकेरी वाहतूक ठेवावी. 

इतर अंत्यसंस्कारासाठी बेड उपलब्ध व्हावेत

मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, प्रत्येक बुधवार व रविवारी रक्षाविसर्जन प्रामुख्याने होते. परंतु, सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोल्हापूरचा नागरिक म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे. पंचगंगा स्मशानभूमीत गर्दी होऊ नये, यासाठी आणि इतर अंत्यसंस्काराला बेड उपलब्ध होण्यासाठी दुसर्‍या दिवशीच रक्षाविसर्जन करावे. 

ऑक्सिजन असलेल्या बेडची संख्या वाढवणार

आयुक्‍त डॉ. मल्‍लिनाथ कलशेट्टी म्हणाले, पंचगंगा स्मशानभूमीत 11 ते 20 बेडचे काम सुरू आहे. कसबा बावडा येथे 14 बेड आहेत. तेथे बेड वाढवत आहोत. त्याचप्रमाणे 8 बेड कदमवाडी व 6 बेड जाधववाडी येथे आहेत. या ठिकाणी नॉन कोव्हिड रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. पंचगंगा स्मशानभूमी येथेच स्वतंत्ररीत्या कोव्हिड रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. गॅसदाहिनी सुरू झालेली आहे. महापालिका व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने शहरात ऑक्सिजन असलेल्या बेडची संख्या वाढविण्यात येत आहे. 
यावेळी उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती संदीप कवाळे, प्राथमिक शिक्षण समिती सभापती श्रावण फडतारे, महिला व बालकल्याण समिती सभापती शोभा कवाळे, गटनेता सत्यजित कदम, राहुल चव्हाण, उपायुक्‍त निखिल मोरे, उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, माजी नगरसेवक बाबा पार्टे, नागरी कृती समिती रमेश मोरे, शेतकरी कामगार पक्षाचे संभाजी जगदाळे, प्रजासत्ताक सेवा संस्थेचे दिलीप देसाई, महादेव पाटील, आशपाक आजरेकर उपस्थित होते.

बाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी गॅस दाहिनीचा वापर व्हावा : देशमुख

काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख म्हणाले, रक्षाविसर्जनला नागरिक कमी यावेत, यासाठी जनजागृती करून उपाययोजना कराव्यात. स्मशानभूमीत याबाबत जनजागृतीसाठी प्रबोधनात्मक फलक लावावेत. गॅसदाहिनी आणि शेजारील बेड कोरोनाने मृत्यू झालेल्यांसाठी राखीव ठेवावेत. बुधवार पेठ येथून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा. कोरोनाच्या काही रुग्णांना ऑक्सिजनची गरज असते यावेळी त्यांच्या नातेवाईकांकडून व्हेंटिलेटर असलेल्या दवाखान्यामध्ये धावाधाव केली जाते. त्यांना खरी स्थिती काय आहे, याची माहिती होण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

केएमटीत ऑक्सिजन बेड करा : महापौर

महापौर आजरेकर यांनी दक्षता म्हणून अंत्यसंस्कारानंतर दुसर्‍या दिवशी रक्षाविसर्जन करावे, असे आवाहन केले. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर स्मशानभूमीत स्वतंत्र गॅसदाहिनीमध्येच अंत्यसंस्कार करावेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपचारासाठी दिलेल्या के.एम.टी. बसमध्ये ऑक्सिजन बेड उपलब्ध करावेत, अशी सूचना त्यांनी केली.