Wed, Aug 12, 2020 12:27होमपेज › Kolhapur › सीपीआरमध्ये 50 हजार स्वॅब तपासणी

सीपीआरमध्ये 50 हजार स्वॅब तपासणी

Last Updated: Aug 02 2020 1:04AM
कोल्हापूर : एकनाथ नाईक 

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय व  राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडा पार्कातील कोरोना विषाणू संशोधन व निदान प्रयोग (लॅब) शाळेतून अवघ्या दोन महिन्यांत आरटीपीसीआर उपकरणाद्वारे 50 हजार 414 स्वॅबची तपासणी पूर्ण झाली. यामध्ये 4666 रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, तर 45 हजार 200 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सीपीआरमधून 802 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज केले आहे. गंभीर 84 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

जिल्हा प्रशासनाच्या विशेष प्रयत्नातून 1 मे रोजी कोरोना विषाणू संशोधन व निदान प्रयोग शाळा वैद्यकीय महाविद्यालय शेंडा पार्क येथे सुरू झाली. प्रयोगशाळेत तज्ज्ञ आणि तंत्रज्ञाची टीम 14 ते 16 तास स्वॅब तपासणी करत आहे. कोरोना विषाणूचा शोध घेणारे हेच खरे पडद्यामागचे हिरो आहेत. सीपीआरमध्ये घेतलेले स्वॅब त्वरित तपासणी होऊ लागल्याने रुग्णांवर पुढील उपचार करणे सोयीचे होत आहे. पडद्यामागे असणार्‍या या टीमचे कामही तितकेच महत्त्वाचे आहे.

सीपीआर कोरोनासाठी राखीव असून येथे उपचारासाठी येणार्‍या रुग्णांची संख्याही मोठी आहे. दररोज 400 ते 800  रुग्णांचे स्वॅब घेतले जातात. अनेक वेळा रुग्णांची संख्या वाढते. घेतलेले स्वॅब पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे तपासणीसाठी पाठविले जात होते. महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रकोप आणि स्वॅब तपासणीसाठी होणारा विलंब लक्षात घेऊन आयसीएमआरने राज्यात खासगी प्रयोगशाळांसह ससून, हाफकीन, बीजे या संस्थांना चाचण्यांची परवानगी दिली. वैद्यकीय विभागाने अकोला, धुळे, सोलापूर, लातूर, मिरज, औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चाचण्यांच्या सुविधा सुरू केल्या. मिरज येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोग शाळेवर पडणारा ताण लक्षात घेऊन कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाची प्रयोगशाळा सुरू करण्यास परवानगी दिली.

 सूक्ष्म जीवशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. स्मिता देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विजय कुलकर्णी, डॉ. अपराजित वालावलकर, डॉ. शिल्पा पुट्टा, डॉ. हेमांगी वलके, डॉ. रजनी जगदाळे, डॉ. अश्‍विनी राजमाने, डॉ. कगनुलकर, तंत्रज्ञ अश्‍विनी सावंत, मेघा म्हेतरस, प्रेमजित सरदेसाई, मनीषा नाईक, शरयू साळोखे, शमा गडकरी, वैशाली कांबळे आदींचे वैद्यकीय पथक कोरोना विषाणू विरोधात लढत आहे. 

दिवसाला 800—1000 स्वॅबची तपासणी

 दिवसाला सुमारे 800 ते 1000 स्वॅबची तपासणी केली जात आहे. त्याचा अहवाल वेळेत पोहोचविण्यासाठी ही टीम रात्रंदिवस काम करत आहे. दिवस - रात्र  लॅबमध्ये स्वॅब तपासणी सुरू राहते. दोन टप्प्यामध्ये स्वॅब तपासणी केली जाते. विशेष म्हणजे, स्वॅब तपासणीचे उपकरण अत्याधुनिक असल्याने अचूक निदानावर भर दिला जात आहे.