Mon, Aug 03, 2020 15:02होमपेज › Kolhapur › पूरग्रस्तांच्या मदतीतून लांडगे परिवाराने जपला पन्नास वर्षाचा ऋणानुबंध

पूरग्रस्तांच्या मदतीतून लांडगे परिवाराने जपला पन्नास वर्षाचा ऋणानुबंध

Published On: Aug 14 2019 4:51PM | Last Updated: Aug 14 2019 4:51PM
राशिवडे : प्रवीण ढोणे

कलापूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या लाल मातीशी अनेकांचे वर्षानुवर्षाचे ऋणानुबंध आहेत. लाल मातीत लहानपणी लोळलेल्या आणी यशस्वी मल्ल असलेल्या भोसरी पुणे येथील पैलवान किसनराव शंकर लांडगे यांनी कोल्हापुरशी असणारं आपुलकीचं अतुट नातं कायम ठेवलं आहे. आरे (ता.करवीर) गावांशी कुस्तीच्या रूपाने असणारी आपुलकी पन्नास वर्षानंतरही कायम ठेवली आहे. पुराच्या चिखलात अख्खा संसार रूतलेल्या आरेकरांना लांडगे परिवाराने दोन ट्रक तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी सोळा ट्रक संसारोपयोगी साहित्य देऊन ऋणानुबंध जपला आहे. आमदार महेशदादा लांडगे हे स्वत: ही पूरग्रस्तांना मदत वितरित करण्यात पुढे होते.

भोसरी पुणे येथील ६५ वर्षीय पैलवान किसनराव लांडगे यांनी कुस्तीचे धडे कोल्हापुरातच गिरविले. आरे गावचे संभाजी वरुटे, जयसिंग पाटील, कै.बाजीराव वरूटे यांच्याशी त्यांनी कुस्तीचे धडे गिरवले. कुस्तीच्या निमित्‍ताने आरे गावांसह शहर जिल्ह्याशी संपर्क आला. आठवडाभरापुर्वी कोल्हापूर जिल्ह्याला महापुराने विळखा घातला. अनेक गावे पाण्याखाली गेली, घरे पत्याप्रमाणे कोसळली, मोठ्या प्रमाणात अर्थिक नुकसान झाले. ही माहिती कळताच लांडगे पैलवान अस्वस्थ बनले. पुरामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद असल्यामुळे ते बेचैन झाले. त्याचे पुत्र आमदार महेशदादा लांडगे यांनीही कोल्हापुरातच तीन वर्ष कुस्तीचा सराव केल्याने या पिता-पुत्रांना कोल्हापुरची ओढ लागली होती. अखेर राष्ट्रीय महामार्ग सुरु झाल्याचे समजताच पैलवान किसनराव लांडगे यांनी आमदार महेशदादा यांना सोळा ट्रक मदतीचे साहित्य घेऊन कोल्हापुरला पाठविले. आमदार लांडगे यांनी आरे गाव गाठून मदतीचे दोन हात पुढे केले. याचबरोबर  कागल - बानगे, गडहिंग्लज -भडगाव, भुदरगड-शेणगाव, गगनबावडा-पाटपन्हाळा आदी ठिकाणी सोळा ट्रक मदतीचे साहित्य पाठविले. तांदुळ, कडधान्य, तेल, साबण, औषधे, लहान मुलांचे कपडे, पाणी, अंथरुन आदी साहित्य पुरग्रस्तांना पोहोच करुन कोल्हापूरच्या मातीशी असणारं ऋणानुबंध अधिक घट्ट केलं.

पन्नास वर्षापासून कुस्तीच्या निमित्यानं कोल्हापूर शहर व जिल्ह्याशी असणारं आपुलकीचं नातं मदतीच्यारुपानं अधिकच घट्ट केलं. म्हणुनच सलाम आहे कोल्हापुरच्या लाल मातीतील कुस्तीला आणी कोल्हापुरच्या माया ममतेला. जाता जाता त्यांनी हसूर येथील त्यांचे स्वीय सहाय्यक संदिप ठाणेकर यांच्याही गावाला व घरी भेट दिली, तसेच पुढील काळात निश्चितच या भागातील गावांसाठी मोठी मदत करण्याचे आश्वासन दिले याबाबत हसुर दुमाला, आरे, सडोली खा, घाणवडे, शिरोली दुमाला येथील मान्यवर यांनी आभार मानले.