Fri, Dec 04, 2020 05:17होमपेज › Kolhapur › गोरंबेतील विद्यार्थिनी ट्रॉलीखाली सापडून ठार

गोरंबेतील विद्यार्थिनी ट्रॉलीखाली सापडून ठार

Published On: Dec 28 2017 1:33AM | Last Updated: Dec 28 2017 1:33AM

बुकमार्क करा
कागल : प्रतिनिधी

ऊस घेऊन जाणार्‍या ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून ज्योती गोविंद गावडे (वय 15, रा. गोरंबे, ता. कागल) ही आठवीत शिकणारी विद्यार्थिनी जागीच ठार झाली. हा अपघात बुधवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास केनवडे-गोरंबे रस्त्यावर घडला. सावर्डे बुद्रुकच्या महालक्ष्मी हायस्कूलमध्ये ज्योती शिकत होती. शाळेत सध्या क्रीडा महोत्सव सुरू असल्याने सकाळच्या सत्रात शाळा होती. शाळा सुटल्यानंतर ज्योती  मैत्रिणींसह  सायकलवरून घरी  जात होती. सुतारकीच्या ओढ्याजवळ रस्त्याला घसरण असल्याने ती इतर मुलींच्या पुढे होती.

यावेळी गोरंबेच्या दिशेनेच जाणार्‍या उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या पुढे जात असताना मागून येणार्‍या मोटारसायकलने तिला  जोराची धडक दिली.  यात ती रस्त्यावर पडली. याचवेळी ट्रॉलीचे चाक तिच्या डोक्यावरून गेले तर मारुती मोटार पायावरून गेली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. धडक देणारा मोटारसायकलस्वार आणि मारुती मोटारचालकही अपघातानंतर पसार झाले. त्यामुळे नेमका अपघात कसा झाला, याबाबत कोणालाही समजले नाही. कागलचे पोलिस उपनिरीक्षक सुनील माळगे आणि कॉन्स्टेबल ढगळे घटनास्थळी आले. गोरंबेतील ग्रामस्थांनीही घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. ज्योतीच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत होती.