Sat, Feb 29, 2020 18:01होमपेज › Kolhapur › उत्पादन कमी होऊनही चांगला भाव अशक्य?

उत्पादन कमी होऊनही चांगला भाव अशक्य?

Published On: Jul 06 2019 1:34AM | Last Updated: Jul 06 2019 12:00AM
कोल्हापूर : राजेंद्र जोशी

देशात साखरेच्या आगामी हंगामामध्ये उत्पादनात सुमारे 30 टक्क्यांहून अधिक घट अपेक्षित असल्याचा अंदाज बहुतेक संस्थांनी व्यक्‍त केला असला, तरी साखरेच्या दरामध्ये कोणतीही मूलभूत वाढ होणे अशक्य आहे, यावर या क्षेत्रातील तज्ज्ञांचे एकमत होऊ लागले आहे. नव्या हंगामात साखर उत्पादन 300 लाख मेट्रिक टनाच्या खाली घसरण्यासारखी स्थिती असली, तरी साखरेच्या दरवाढीला देशातील हंगामपूर्व शिल्लक साठ्याने लगाम घातला असून, नोव्हेंबर 2019 पर्यंत देशातून सुमारे 70 लाख मेट्रिक टन साखरेची निर्यात झाली नाही, तर हा हंगाम साखर कारखानदारीला अडचणीत तर जाईलच; शिवाय शेतकर्‍यांची कारखानदारीकडून बिलापोटी थकीत असलेल्या 19 हजार कोटी रुपयांचा परतावा मिळण्यात मोठा अडथळा निर्माण होणार आहे. यातील बहुतेक थकीत रक्‍कम ही उत्तर प्रदेशातील उत्पादकांची आहे. 

साखरेच्या बाजारात मागणी वाढून पुरवठा कमी झाला की भाव वाढतात, हा अर्थशास्त्राचा नियम तंतोतंत लागू पडतो; पण यावेळी या नियमाला देशातील शिल्लक साठ्याने अपशकून केला आहे. गतवर्षी देशातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडल्याने पश्‍चिम महाराष्ट्र वगळता देशातील उर्वरित क्षेत्रात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात कमी झाली. लागवडीखालील क्षेत्र घटल्याने उत्पादन 30 टक्क्यांवर घटेल, असा अंदाज आहे. साहजिकच, दरवाढ होऊन नव्या हंगामात शेतकर्‍यांच्या हातात चार पैसे अधिक पडण्याची अपेक्षा होती; पण गेल्या दोन साखर हंगामात झालेल्या विक्रमी उत्पादनामुळे  हंगामपूर्व शिल्लक साठ्यात कमालीची वाढ झाली. जागतिक बाजारातील साखरेचे दर पडल्याने नियोजित निर्यातही होऊ शकली नाही. परिणामी, आजपर्यंतच्या सरासरी हंगामपूर्व शिल्लक साठ्याच्या तिपटीने म्हणजेच 145 लाख मेट्रिक टन साखरसाठा देशात निर्माण झाला आहे. हा साठाच नव्या हंगामातील दरवाढीच्या मुळावर येऊन बसला आहे.

साखर उद्योगाच्या अर्थकारणाच्या अभ्यासकांच्या मते, ऑक्टोबर 2019 ला सुरू होणार्‍या हंगामात साखर उत्पादन 285 लाख मेट्रिक टनापर्यंत जाईल आणि हंगामपूर्व शिल्लक साठ्याचा विचार करता हंगामादरम्यान 430 लाख मेट्रिक टन साखरेची उपलब्धतता असेल. या तुलनेत साखरेचा देशांतर्गत वापर मात्र 255 लाख मेट्रिक टन इतका असणार आहे. याचा हिशेब केला, तर 175 लाख मेट्रिक टन साखर अतिरिक्‍त ठरते. हा साठा साखरेचे भविष्यातील अर्थकारण बिघडविण्यास कारणीभूत ठरणार आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकार 50 लाख मेट्रिक टन साखरेचा बफर स्टॉक करण्याच्या तयारीत आहे.

परंतु, ही उपाययोजना तितकी पुरेशी नाही. 
सध्या बाजारात केंद्र सरकारने साखरेला किमान हमीभाव जाहीर केल्यामुळे साखर 31 रुपये किलो दराने विकली जाते आहे. हे बंधन काढले तर साखरेचे भाव 28 रुपयांवर येऊ शकतात. यामुळे किमान 70 लाख मेट्रीक टन साखर अनुदान देऊन निर्यातीद्वारे देशाबाहेर घालविणे गरजेचे आहे. एवढे उपाय करुनही हा प्रश्‍न पूर्णतः सुटत नाही. या सर्वांचा विचार केला तर नव्या हंगामात उत्पादन कमी होऊनही साखरेला चांगला भाव मिळण्याची शक्यता धूसर होत चालली आहे.