Tue, Aug 11, 2020 22:30होमपेज › Kolhapur › एफआरपी देणे अशक्य

एफआरपी देणे अशक्य

Published On: Dec 23 2017 2:05AM | Last Updated: Dec 23 2017 1:17AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

साखर दरात घसरण सुरू असून त्यात सुधारणा न झाल्यास शेतकर्‍यांना उसाची एफआरपी देणे शक्य नसल्याचे पत्र इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) या साखर कारखानदांच्या संघटनेने केंद्रीय अन्‍न व नागरी पुरवठा मंत्रालयाला दिले आहेत. प्रतिक्‍विंटल 3400 रुपयांच्यावर दर मिळाला, तर कारखान्यांना एफआरपी देणे शक्य असल्याचे पत्रात स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानने साखर निर्यातीसाठी प्रोत्साहनपर अनुदान वाढविले असल्याकडे ‘इस्मा’ने या पत्रातून सरकारचे लक्ष वेधले आहे. परदेशातील साखर अजिबात आयात होणार नाही, याकडे गांभीर्याने पाहण्याबरोबरच आपली साखर निर्यात करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबतही सूचित केले आहे. पाकिस्तानची साखर आयात झाली, तर स्थानिक बाजारात साखरेचे दर आणखी कोसळण्याची भीती व्यक्‍त करण्यात आली आहे.

गेल्या दीड महिन्यात साखरेचा दर प्रतिक्‍विंटल 500 रुपयांनी घसरला आहे. सध्या हा दर तीन हजार ते 3200 रुपये प्रतिक्‍विंटल आहे. हाच दर कायम राहिल्यास एफआरपी देणे कोणत्याच कारखान्याला शक्य होणार नसल्याने सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज या पत्रात व्यक्‍त केली आहे. ‘इस्मा’चे महासंचालक अविनाश वर्मा यांनी केंद्रीय अन्‍न व नागरी पुरवठा मंत्रालयाचे सहसचिव सुभाषिस पांडा यांना लिहिलेल्या या पत्रात म्हटले आहे की, सरकारने आयात शुल्क वाढविले असले तरी त्यामुळे फारसा परिणाम होईल, असे दिसत नाही. म्हणून साखर आयात पूर्णपणे बंदच करावी लागेल. कारण किरकोळ बाजारातील साखरेचा दर 40 ते 42 रुपये प्रतिकिलोच्या पुढे जाणार नाही, याची दक्षता सरकार घेत आहे.