Wed, May 12, 2021 01:19होमपेज › Kolhapur › हवा प्रदूषणामुळे हृदयविकाराला निमंत्रण!

हवा प्रदूषणामुळे हृदयविकाराला निमंत्रण!

Published On: Sep 29 2018 1:38AM | Last Updated: Sep 29 2018 12:03AMकोल्हापूर : सतीश सरीकर

कोल्हापूर शहरातील हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विषारी दूषित कणांमुळे अस्थमा, फुफ्फुसाचे गंभीर स्वरूपाचे आजार होण्याची तीव्रता वाढत आहे. हवा प्रदूषणामुळे हृदयविकाराच्या प्रमाणात वाढ होत आहे. कोल्हापूर महापालिकेने तयार करून घेतलेल्या पर्यावरणविषयक अहवालातील निष्कर्षातून प्रदूषणाचे हे गंभीर वास्तव समोर आले आहे. 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कोल्हापूर शहरात हवेचे प्रदूषण मोजण्यासाठी चार ठिकाणे आहेत. दाभोळकर कॉर्नर, पापाची तिकटी, अंबाबाई मंदिर व शिवाजी विद्यापीठ यांचा त्यात समावेश आहे. हवेतील पीएम 10 (पार्टिक्युलेट मॅटर लेस दॅन 10 मायक्रॉन) चे म्हणजेच विषारी दूषित कणांचे प्रमाण धोकादायक पातळीवर गेल्याचे निदर्शनास आले आहे. हवेत जास्तीत जास्त पीएम 10 हे 60 मायक्रॉन पाहिजे. परंतु, कोल्हापुरातील हवेत त्याचे प्रमाण 160 मायक्रॉनइतके आढळून आले आहे. त्याबरोबरच हवेतील एनओएक्स (ऑक्सॉईडस् ऑफ नायट्रोजन)च्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एनओएक्सचे हवेतील प्रमाण हे जास्तीत जास्त 40 मायक्रॉन पाहिजे. परंतु, कोल्हापुरात त्याचे प्रमाण 55 मायक्रॉनच्यावर पोहोचले आहे. नागरिकांना अ‍ॅलर्जीसह विविध गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. विशेषतः लहान मुले व वयोवृद्धांना त्याचा सर्वाधिक त्रास जाणवत आहे. हवेतील दूषित कण वाढण्याचे कारण पडताळण्यासाठी नियमित हवेची चाचणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रदूषणाची योग्य कारणे शोधता येतील. त्यानुसार महापालिकेच्या वतीने उपाययोजना व कार्यपद्धती ठरविता येईल. सूक्ष्म धुलीकरणाचे संभाव्य स्रोत नैसर्गिक धुळीचे कण, जीवाश्म इंधनाचे ज्वलन (उदा. पेट्रोल, डिझेल, रॉकेल) घरगुती स्रोत (चूल, कोळसा) आहेत. हे धुलीकण श्‍वसनासंबंधी आजार निर्माण करतात. फुफ्फुसातील ऑक्सिजन शोषण क्षमता कमी होते. परिणामी, रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. फुफ्फुसाला गंभीर स्वरूपाचे रोग होण्याची तीव्रता वाढविते. 

हृदय किंवा फुफ्फुसाचा रोग असलेल्या लोकांना अकाली मृत्यू ओढवू शकतो. हृदयविकाराचा झटका, तीव्र अस्थमा, फुफ्फुसाचे काम कमी होणे, वायुमार्गात जळजळ होणे, खोकणे किंवा श्‍वास घेण्यास त्रास होणे यासारख्या श्‍वसनासंबंधी आजारांची लक्षणे वाढतात. त्यामुळे आरोग्य विभागाने अशा संबंधित आजारांची पाहणी करून दरवर्षी या आजाराने पीडित रुग्णांची नोंद करणे आवश्यक आहे, असेही अहवालात म्हटले आहे. 

कोल्हापूरची हवा धोक्याच्या पातळीवर
वाहनांच्या संख्येतील बेसुमार वाढ , वाढती बांधकामे, शहर परिसरातील दगडांच्या खाणी, चुना भट्टी, घनकचर्‍याची योग्य विल्हेवाट न लावणे, उत्खनन याचा परिणाम हवेवर झाला आहे. त्यामुळेच शहरवासीयांना अस्थमा, हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, वेगवेगळ्या अ‍ॅलर्जी, फुफ्फुसाचे आजार, डोळ्यांचे विकार, हृदयविकाराला सामारे जावे लागत असल्याचे स्पष्ट होत आहे. 

उपाय योजना
धुलीकण कमी करण्यासाठी वृक्षारोपण वाढवले पाहिजे.

ठिकठिकाणी, चौकांत प्रदूषकांचे स्तर प्रदर्शित केले पाहिजेत.

एअर क्वॉलिटी इंडेक्स नागरिकांना त्यांच्या दैनंदिन कामकाजाची आखणी करण्यास मदत करेल.

प्रदूषकांचा आरोग्यावरील प्रतिकूल परिणाम याची प्रभावी माहिती निदर्शनास आणून विद्यार्थ्यांमार्फत जागरूकता अभियान हे वाहतूक सुरक्षा आठवडासमवेत करता येईल. 

शहरात वाहनांमुळे सुमारे 70 टक्के प्रदूषण होते. त्यामुळे पंधरा वर्षांपेक्षा जास्त वापर झालेल्या वाहनांचा वापर बंद करावा.