Fri, Feb 28, 2020 23:09होमपेज › Kolhapur › भारतीय औषध उद्योगाचा मोर्चा चीनकडे!

भारतीय औषध उद्योगाचा मोर्चा चीनकडे!

Published On: Feb 16 2018 1:52AM | Last Updated: Feb 16 2018 1:52AMकोल्हापूर : राजेंद्र जोशी

अमेरिकन औषधांच्या बाजारपेठेमध्ये आपले पाय घट्ट रोवल्यानंतर भारतीय औषध उद्योगाने आता जगातील दुसर्‍या क्रमांकाची औषधांची बाजारपेठ असलेल्या चीनकडे मोर्चा वळविला आहे. चीनमधील शासनाने औषध उद्योगातील उद्योग उभारणीच्या आणि नव्या औषधांच्या अनुमतीसाठी झटपट प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतातील औषध कंपन्या चीनमध्ये आपले बस्तान बसवण्यासाठी सरकताहेत. यामध्ये हैदराबाद येथील मुख्यालय असलेल्या डॉ. रेड्डीज् लॅबोरेटरिज या कंपनीने पुढाकार घेतला असून, लवकरच सिप्ला, ल्युपिन, रणबक्षी, वोकहार्ट या कंपन्या चीनमध्ये प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहेत.

जगामध्ये औषधनिर्मितीची मोठी बाजारपेठ म्हणून भारताकडे पाहिले जाते. कच्च्या मालाची उपलब्धता, स्वस्त मनुष्यबळ आणि देशांतर्गत मोठ्या बाजारपेठेबरोबर उद्योगाला पोषक वातावरण, यामुळे जगातील बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतात यापूर्वीच पाय रोवले आहेत. यातून प्रतिवर्षी देशांतर्गत सुमारे एक लाख कोटी रुपयांची उलाढाल औषध उद्योगात होते, तर भारतातून जगाच्या बाजारपेठेतही सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या (16.84 बिलियन डॉलर्स - 2016-17) औषधांची निर्यात होते. जगाला एकूण आवश्यकतेच्या सुमारे 20 टक्के जेनरिक औषधांची निर्यात करणार्‍या भारतीय औषध उद्योगाने आजपर्यंत अमेरिका, आफ्रिका आणि युरोप खंडावर आपले लक्ष केंद्रित केले होते. यामध्ये दुसर्‍या क्रमांकाची चीनची बाजारपेठ दुर्लक्षित होती. अलीकडेच चीनने बाहेरील उद्योगांसाठी पायघड्या अंथरणे सुरू केल्यानंतर भारतीय उद्योगांनीही त्यामध्ये उडी घेतली आहे.

चीनमध्ये प्रतिवर्षी औषध उद्योगात सुमारे सहा लाख कोटी  रुपयांची (100 बिलियन डॉलर) उलाढाल होते. यामध्ये भारतीय उद्योगाचा वाटा अवघा 106 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 680 कोटी रुपये इतका आहे. यामुळे चीनमध्ये उद्योगाला असणारी संधी हेरून औषध कंपन्यांनी आपला मोर्चा वळविला आहे. यामध्ये प्रामुख्याने डॉ. रेड्डीज् लॅब कर्करोगावरील औषधांची निर्मिती करणार आहे, सिप्ला आणि वोकहार्ट या कंपन्या सर्वसामान्य आजारांसाठी लागणारी प्रतिजैविके, तसेच फुफ्फुसाच्या रोगावरील प्रतिजैविके यांची निर्मिती करणार आहे. याकरिता संबंधित कंपन्यांचे काही बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबर परस्पर सहकार्य आणि भागीदारीविषयक करारही प्रगतिपथावर आहेत.