Mon, Jul 13, 2020 17:50होमपेज › Kolhapur › टपालाचे महत्त्व वाढता वाढे...

टपालाचे महत्त्व वाढता वाढे...

Published On: Jun 12 2019 1:19AM | Last Updated: Jun 11 2019 11:19PM
कोल्हापूर ः शेखर दुग्गी

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संदेश वहनाची साधने कितीही वाढली तरी टपालाचे महत्त्व अजूनही टिकून आहे. विविध शासकीय कामांपासून ते ई-कॉमर्सपर्यंत टपाल वाहतुकीचे काम मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पोस्टकार्ड आणि अंतरदेशीकार्ड वगळता सर्व टपाल सुरूच आहे. पोस्टात दिवसाला बाहेरून 30 हजार टपाल बटवड्यासाठी येतात, तर जिल्ह्यातून दररोज 15 ते 20 हजार पत्रे बाहेरगावी पाठवली जातात.

पूर्वी टपाल हेच संदेश वहनांचे महत्त्वाचे साधन असायचे. लोकांना भावनात्मकद‍ृष्ट्या एकमेकांना जवळ आणण्याचे काम हीच पत्रे किंवा अंतरदेशीकार्ड करायचीत. आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात एका क्षणात जगभरातील माहिती सहल उपलब्ध होते. मोबाईल, व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक, ई-मेल, ट्विटर ही संदेश वहनांची साधने आल्याने जग जवळ आले आहे.

जिल्ह्यातील सर्वच 563 पोस्ट कार्यालये इंटरनेटशी जोडली गेली आहेत. पोस्टातील सर्व व्यवहार आता ऑनलाईन चालतात. असे असेल तरी विविध शासकीय कामे, सरकारी योजना तसेच बँकांचे एटीएम, चेकबुक, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसेन्स, मासिके, टेंडर, बढती, एलआयसीची कागदपत्रे पाठविण्यासाठी पोस्टाचाच आधार घ्यावा लागतो. यावरून टपालाचे महत्त्व आधोरेखीत होते.

पोस्ट खात्याने वीज, दूरध्वनी, विविध कंपन्यांचा विमा हप्‍ता स्वीकारणे, रेल्वे, विमान आणि एस.टी.ची तिकीटे काढून देणे, विविध विद्यापीठे, पोलिस, एमपीएसी आणि यूपीएससीच्या परीक्षांचे अर्ज विकणे, आदी सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

पार्सल हब 

पोस्टातून विविध कंपन्यांची ऑनलाईन उत्पादनेही ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची सुविधा दिली जाते. यासाठी रेल्वे स्टेशन येथील आरएमएममध्ये स्वतंत्र पार्सल हब सुरू करण्यात आला आहे. यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवली जाते. ग्राहकांना लवकरात लवकर पार्सल कसे देता येईल, यासाठी ही यंत्रणा काम करत आहे.