Thu, Feb 20, 2020 19:14होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात सूक्ष्म धुलिकण प्रमाणात वाढ

कोल्हापुरात सूक्ष्म धुलिकण प्रमाणात वाढ

Published On: Jun 05 2019 1:28AM | Last Updated: Jun 05 2019 1:08AM
कोल्हापूर : प्रवीण मस्के

कोल्हापूर शहरातील हवेत सूक्ष्म धुलिकणांचे प्रमाण अधिक असल्याचा निष्कर्ष शिवाजी विद्यापीठ पर्यावरण विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तपासणीतून पुढे आला आहे. नागरिकांमध्ये पर्यावरण जागृतीबरोबरच रस्ते सफाई, वाहनांची वेळेवर तपासणी होणे आवश्यक आहे. 

दरवर्षी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. ‘बीट द एअर पोल्युशन’ (हवा प्रदूषण कमी करावे) ही यावर्षीची थीम आहे. भारतातील 94 शहरे हवा प्रदूषणाची मानके ओलांडत असल्याची माहिती पर्यावरण राज्यमंत्री महेश शर्मा यांनी एप्रिल 2018 मध्ये लोकसभेत दिली होती. यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, सांगली, सोलापूर, कोल्हापूरसह 17 शहरांचा समावेश आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने या 94 शहरांतील हवा प्रदूषण कमी होण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. 

विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोल्हापूर शहरातील हवेमधील प्रदूषकांची 2014 ते डिसेंबर 2018 पर्यंतची तपासणी केली. सांख्यिकी माहितीच्या आधारे अहवाल तयार करण्यात आला आहे. यात सल्फरडाय ऑक्साईड, नायट्रसडाय ऑक्साईडच्या तुलनेत महाद्वार रोड व दाभोळकर कॉर्नर येथे सूक्ष्म धुलिकणांचे (आरएसपीएम)  प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे.  

वाहनांमधून बाहेर पडणारा धूर, वाहनांची वाढती संख्या, चुकीचे वाहन पार्किंग, महापालिकेकडून घनकचरा जाळणे, शेतातील पालापाचोळा, पाचट जाळले जाणे. रस्त्यावरील धूळ, नवीन इमारती बांधकाम, जुन्या इमारती पाडणे, बेकरी, हॉटेल्स, वीटभट्ट्या, घरगुती चुली, इतर छोट्या-मोठ्या उद्योगांमधून बाहेर पडणार्‍या धुरामुळे प्रदूषण वाढत आहे, अशी कारणे निष्कर्षातून पुढे आली आहेत. याचा विचार करून पर्यावरण रक्षणासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्रत्येकाने हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी स्वत:पासून सुरुवात करावी. जेणेकरून भविष्यातील पिढीला शुद्ध हवा मिळेल. वसुंधरा येणार्‍या संकटापासून वाचू शकेल.- पी. डी. राऊत, विभागप्रमुख, पर्यावरणशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ