होमपेज › Kolhapur › भय इथले संपत नाही...

भय इथले संपत नाही...

Published On: Jun 11 2018 1:06AM | Last Updated: Jun 11 2018 12:14AMकोल्हापूर : गौरव डोंगरे 

शहरातील निर्जन ठिकाणांसोबत आता भरवस्तीतही जबरी चोर्‍यांच्या घटनांत वाढ झाली आहे. महाद्वार रोड, मध्यवर्ती बसस्थानक, अंबाबाई मंदिर या ठिकाणी होणार्‍या जबरी चोर्‍या पोलिसांची डोकेदुखी बनली आहे. महिलांमध्येही या घटनांनी घबराटीचे वातावरण आहे. लागोपाठ घडणार्‍या चेन स्नॅचिंगमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. 

मे महिन्यात लग्नसमारंभांमुळे महिला दागिने सर्रास वापरतात. चोरट्यांचा उपनगरात सुळसुळाट वाढतो. रविवार, 3 मे रोजी दुपारी चार ते सहाच्या दरम्यान शहरात तीन ठिकाणी सोनसाखळी चोरीचे प्रकार घडले. आर. के. नगरात फेरफटका मारण्यास गेलेल्या अल्का उत्तुरे यांची दीड तोळ्यांची सोनसाखळी हिसडा मारून चोरून नेली. तर चारच्या सुमारास इंगळेनगरातून सुलक्षणा सुखी यांचे साडेपाच तोळे दागिने लंपास करण्यात आले. फुलेवाडी रिंगरोडवरही याच दरम्यान चेनस्नॅचिंगचा प्रकार घडला. 

मध्यवर्ती बसस्थानकावर आलेल्या एलआयसी अधिकार्‍याचे पाकीट चोरट्यांनी याच दिवशी लंपास केले. त्यातील रोख 25 हजारांची रक्कम तसेच एटीएम कार्डचा वापर करून 25 हजार 500 अशा पन्नास हजारांच्या रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला. याच महिन्यात वांगीबोळात चोरट्याने वृद्धेच्या गळ्यातील माळ लांबवली. त्याला पकडण्यात यश आले असले, तरी इतर गुन्ह्यांची उकल अद्याप होऊ शकलेली नाही. जानेवारी ते मार्च महिन्यादरम्यान सोनसाखळी चोरीचे 11 गुन्हे घडले असून यापैकी केवळ 2 गुन्हे उघडकीस आले आहेत. तर जबरी चोरीच्या 39 घटनांतील 24 गुन्ह्यांची उकल पोलिसांना करता आली आहे. अंबाबाई मंदिर आवारात भाविकांचे साहित्य चोरीस जाण्याच्या घटनाही वारंवार घडत असून भाविकांमधूनही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

महिलांनी मोह टाळावा

लग्न समारंभ, सण, उत्सव, कौटुंंबिक कार्यक्रम या ठिकाणी जाताना महिलांनी दागिन्यांचा कमीत कमी वापर करावा. बेंटेक्सचे दागिने वापरणे हा एक पर्याय ठरू शकतो. तसेच प्रवासादरम्यान सोबत कोणी असल्यास अशा प्रकारांना आळा घालणे शक्य होईल.