Mon, Jul 06, 2020 22:56होमपेज › Kolhapur › #Women’sDayगुड न्यूज : कोल्हापुरात स्त्री जन्मदरात वाढ

#Women’sDay कोल्हापुरात स्त्री जन्मदरात वाढ

Published On: Mar 08 2018 2:05AM | Last Updated: Mar 08 2018 12:32PMकोल्हापूर : विजय पाटील 

मुलगी झाली हो! असे आता अभिमानाने बहुतेक कोल्हापूरकर सांगू लागले आहेत. मुलगी जन्मल्यानंतर आनंदोत्सव साजरा करणार्‍यांची संख्याही वाढत आहे. कारण राज्याच्या तुलनेत कोल्हापूरचा मुलींचा जन्मदर हा खूप चांगला म्हणजे दरहजारी 930 इतका आहे. याउलट राज्याचा हाच जन्मदर 2016 नंतर पहिल्यांदाच आठ टक्क्यांनी घटत 899 इतका झाला. मुलींचा जन्मदर 950 इतका असणे, हे समाजस्वास्थाच्या दृष्टीने निकोप मानले जाते. कोल्हापूर जिल्ह्याची घोडदौड 950 च्या दिशेने सुरू असल्याचे सकारात्मक चित्र आहे. 

कोल्हापुरात मुलींचा जन्मदर 2011 साली 881 इतका नीचांकी बनला होता. हे प्रमाण निकोप समाजाच्या दृष्टीने अत्यंत घातक मानले जाते. या नीचांकी प्रमाणानंतर मात्र सकारात्मक बदल दिसण्यास सुरू झाले. सामाजिक संघटना आणि सरकारी स्तरावर ‘बेटी बचाओ, बेटी बढाओ’ हा उपक्रम वेगाने सुरू झाला. मुलगा आणि मुलगी फरक करू नका, असा संदेश व्यापक प्रमाणावर देण्यात आला. भ्रूणहत्या रोखण्यासाठी अत्यंत कडक नियम करण्यात आले. गैरकृत्यात सहभागी डॉक्टर आणि संबंधित साखळीलाही जेरबंद करण्यात आले. ‘मुलगी वाचवा’ असे आवाहन करत कोल्हापुरात एक मोहीमच सुरू झाली. या मोहिमेला साहजिकच मोठा प्रतिसाद मिळत गेला. याचा थेट परिणाम आता दिसू लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा जानेवारी 2018 अखेर मुलींचा सरासरी जन्मदर 930 वर जाऊन पोहोचला आहे. ही स्वागतार्ह आणि कौतुकास्पद गोष्ट आहे. 

गावात होतो आनंदोत्सव
मुलगीचा जन्म झाला, तर अनेक गावांत आनंदोत्सव साजरा केला जात आहे. संबंधित माता-पित्यांचा सन्मान केला जात आहे. साखर-पेढे वाटून इतरांनाही आनंदात सहभागी करून घेतले जात आहे.  2012 नंतर राज्यातील मुलींचा जन्मदर हळूहळू वाढू लागला होता. 2014 मध्ये जन्मदर 914 इतका होता. 2015 मध्ये हे प्रमाण 907 आणि 2016 अखेर 899 इतका खाली येत गेला. राज्याच्या तुलनेत कोल्हापूर मात्र जन्मदरात सुधारणा करत आहे.