Wed, Sep 23, 2020 21:06होमपेज › Kolhapur › पर्यटकांना खुणावतोय दाजीपूरचा निसर्ग ...

पर्यटकांना खुणावतोय दाजीपूरचा निसर्ग ...

Published On: Apr 20 2018 1:18AM | Last Updated: Apr 19 2018 11:10PMराशिवडे : प्रवीण ढोणे

राज्यातील अतिसंवेदनशील ठिकाण असणार्‍या पश्‍चिम घाटातील गव्यासाठी राखीव असणार्‍या दाजीपूरच्या अभयारण्यची ओळख निसर्गसंपन्न म्हणूनच आहे. हिरव्यागार वनामुळे पर्यटकांना नेत्रसुख मिळतेच, शिवाय निसर्गाच्या कोंदणात पसरलेले हे अभयारण्य आणि इथले सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. जणू काही उन्हाळी सुट्टीसाठी दाजीपूरचा निसर्गसंपन्न खजिना पर्यटकांना खुणावतच आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला 351 चौ. कि. मी. अंतरामध्ये पसरलेले दाजीपूरचे अभयारण्य निमसदाहारित जंगल प्रकारत मोडते. या अरण्याची उंची समुद्र सपाटीपासून 900 ते 1 हजार फूट असून सरासरी पर्जन्यमान 400 ते 500 मि. मी. आहे. 1958 ला दाजीपूर जंगलाची दाजीपूर अभयारण्य म्हणून नोंद करण्यात आली व 1985 ला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला.

राधानगरी अभयारण्यात आजमितीस 35 प्रकारच्या वन्यप्राण्यांची नोंद झालेली आहे. यामध्ये दुर्मीळ होत चाललेल्या पट्टेरी वाघ, बिबळ्या व फक्त पश्चिम घाटात आढळणारे लहान हरिण गेळा (पिसोरी) यांचा समावेश आहे. तसेच गवा, सांबर, भेकर, रानकुत्रा, अस्वल, चौसिंगा, रानडुक्कर, साळींदर, उदमांजर, खवले मांजर, शेकरू, ससा, लंगूर याचबरोबर वटवाघळाच्या तीन जाती आढळतात. 

पक्षी निरीक्षणासाठी राधानगरी वन्यजीव अभयारण्य एक स्वर्गच आहे. राधानगरी अभयारण्यात आजमितीस 235 प्रकारच्या पक्षी प्रजातींची नोंद झालेली आहे. यामध्ये ग्रेट पाईड हॉर्नबिल, निलगिरी वूड पीजन, मलबार पाईड हॉर्नबिल, तीन प्रकारची गिधाडे या संकटग्रस्त प्रजातींच्या पक्ष्यांचा समावेश आहे. जगात फक्त पश्चिमघाटात आढळणार्‍या पक्ष्यांपैकी 10 प्रजातींचे पक्षी येथे आढळतात. अभयारण्यातील सांबरकोंड, कोकण दर्शन पॉईंट, सावर्दे, काळम्मावाडी धरण, उगवाई देवी मंदिर ही पक्षी निरीक्षणासाठी उत्तम ठिकाणे आहेत.

सरिसृप व उभयचर  : सरिसृप गटात राधानगरी अभयारण्यात वेगवेगळ्या जातींच्या पाली, सरडे, साप - सुरळी आढळतात. उभयचर प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रजातींचे बेडूक आढळतात. गांडुळासारखा दिसणारा देवगांडूळ यासारख्या पर्यावरणात महत्त्वाच्या परंतु दुर्लक्षित अशा उभयचर प्राण्यांच्या जाती येथे आढळतात. 

एका नव्या पालीच्या प्रजातीचा शोध प्रथमच राधानगरी येथे ‘बीएनएचएस’ चे वरिष्ठ संशोधक यांनी लावला. त्या पालीचे नामकरण लशपारीळिी ज्ञेश्रहर्रिीीशपीळी करण्यात आले आहे. राधानगरी अभयारण्यात आजमितीस 33 प्रजातींच्या सापांची नोंद करण्यात आली आहे. ऑलिव्ह फॉरेस्ट स्नेक, एरिक्स व्हिटेकरी, पाईड बेली शिल्डटेल या दुर्मीळ सापांची नोंद झाली आहे.

वनस्पती : भारतातील राधानगरी अभयारण्याचे महत्त्व म्हणजे निमसदाहरित व वर्षाअखेर पानगळीच्या मिसळलेल्या जंगल प्रकारामुळे असंख्य झाडांच्या प्रजातींचे आश्रयस्थान आहे. डोंगरातील दर्‍याखोर्‍यातील घनदाट जंगल, विस्तीर्ण सडे व गवताळ कुरणात असंख्य प्रजातींचे वृक्षवेली, झुडपे, ऑर्किड्स, फुले, नेचे, बुरशी आढळतात. अभयारण्यात 1500 पेक्षा जास्त फूलझाडांच्या प्रजाती आढळतात. भारतातील द्वीपकल्पामधील प्रदेशनिष्ठ 200 प्रजाती येथील भागात आहेत. 300 पेक्षा जास्त औषधी वनस्पतींचे हे भांडार आहे. करवंद, कारवी, निरगुडी, अडुळसा, तोरण, शिकेकाई, रानमिरी, मुरुडशेंग, सर्पगंधा, वाघाटी, धायटी इ. झुडपे व वेली मोठ्या प्रमाणात आहेत.

फुलपाखरे : 121 प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद राधानगरी अभयारण्यात करण्यात आली आहे. सदर्न बर्डविंग हे भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू (190 मी. मी.) असून ग्रास ज्युवेल हे सर्वात लहान फुलपाखरू (15 मी. मी.) आहे. ही दोन्ही फुलपाखरे राधानगरी अभयारण्यात आढळतात. हजारोंच्या संख्येने एकत्र जमून सामूहिक स्थलांतर करणारी ब्लू टायगर, ग्लॉसी टायगर, स्ट्राईप टायगर ही फुलपाखरे या ठिकाणी ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात आढळतात.