मुदाळतिट्टा (कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा
नाधवडे (ता. भुदरगड) येथे दूषित पाण्यामुळे नागरिकांमध्ये गॅस्ट्रो सदृश्य लक्षणे दिसत असून गेल्या पंधरा दिवसांपासून नागरिकांना जुलाब आणि उलट्या सुरु झाल्या आहेत. अनेक रुग्ण गारगोटी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने सर्व गावात गॅस्ट्रोची साथ मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वाचा : भारतासह जग कोरोना ‘व्हॅक्सिन’च्या वळणावर!
नाधवडे येथे पिण्याच्या पाण्याची समस्या नेहमी गंभीरपणे सतावत असते. येथील पाण्याचा जलकुंभ जीर्ण झाल्याने पुर्ण क्षमतेने भरला जात नाही. त्यामुळे एक दिवसाआड पाणी सोडले जाते. तसेच नदीच्या पाण्याबरोबरच अधूनमधून गावतलावात बांधलेल्या जॅकवेलमधील पाणी सोडले जाते. हे पाणी बऱ्याच वेळा दूषित असते. पाण्याच्या शुध्दीकरणासाठी पाण्यात टीसीएल टाकणे आवश्यक असते. पण याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. जलकुंभ जीर्ण झाल्याने कर्मचारी पाण्याच्या टाकीवर चढण्यास धजत नाहीत. त्यामुळे लोकांना सतत गढूळ आणि दूषित पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा लागत आहे.
वाचा : चक्क विमानात 'त्या' व्यक्तीने उघडली छत्री
गावात या दूषित पाण्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून अनेक लोकांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरु झाला आहे. अनेक रुग्ण गारगोटी येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात व खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. दररोज पाच ते सहा रुग्ण दवाखान्यात दाखल होत आहेत. काही गरीब लोकांना आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेणे कठीण जात आहे. अशा परिस्थितीत ग्रामपंचायतीने लक्ष देणे आवश्यक असताना पुर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांतून सांगितले जात आहे. वेळीच उपाय योजना केली नाही तर गॅस्ट्रोची साथ संपूर्ण गावात पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तेव्हा आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीने वेळीच लक्ष घालून साथ आटोक्यात आणावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
पाण्याच्या टाकीचा प्रश्न गंभीर
नाधवडे येथील पाण्याची टाकी पुर्ण जीर्ण झालेली आहे. जीर्ण टाकीमुळे कर्मचारी वर्गाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या टाकी व्यतिरिक्त पाण्यासाठी दुसरी कोणतीही सोय नाही. सध्या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी एक कोटींची पाणी योजना मंजूर झाली आहे. तिचे काम सूरु आहे. तोपर्यंत मदर सोलुशनची टाकी ठेवून पाणी शुद्धीकरण केले जात आहे. आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून योग्य ती खबरदारी घेतली जाईल, असे ग्रामसेवक नवनाथ आदमापुरे यांनी सांगितले.