Tue, Jan 19, 2021 17:16होमपेज › Kolhapur › कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर 14 दिवसांत 18 पट रुग्ण 

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर 14 दिवसांत 18 पट रुग्ण 

Last Updated: May 24 2020 1:17AM

संग्रहित छायाचित्रकोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्ह्यात 14 दिवसांपूर्वी कोरोनाची स्थिती नियंत्रणात असतानाच रेड झोनमधून आलेल्या नागरिकांमुळे रुग्णसंख्येत तब्बल 18 पटीहून अधिक वाढ झाली आहे. विशेषत:, मुंबई आणि पुण्याहून आलेल्या नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याने दिवसेंदिवस ही रुग्णसंख्या वाढतच आहे. येणार्‍या नागरिकांच्या संख्येवर योग्य नियंत्रण न ठेवल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे बोलले जाते.

राज्यात कोरोनाचा प्रकोप सुरू झाला तेव्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू केली. मात्र, त्यापूर्वीच पुण्याहून आपल्या बहिणीच्या घरी आलेला युवक 26 मार्च रोजी कोरोना पॉझिटिव्ह आला. कोल्हापूरचा हा पहिलाच रुग्ण. त्याच्या बहिणीलाही कोरोनाची लागण झाली. त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर सातार्‍याहून कसबा बावडा येथे आलेल्या वृद्धेला लागण झाली. यापाठोपाठ दिल्‍लीहून धार्मिक कार्यक्रमातून परतलेल्या शाहूवाडी तालुक्यातील उचत येथील युवकाला कोरोनाची बाधा झाली. असे एकापाठोपाठ एक 15 रुग्ण चार मेपर्यंत दाखल झाले.

26 मार्चपासून चार मेपर्यंत केवळ 15 कोरोनाबाधित रुग्ण दाखल झाले. एप्रिल महिन्यात 15 पैकी 11 रुग्ण उपचाराअंती बरे झाल्याने केवळ चार पॉझिटिव्ह रुग्ण उरले होते. मात्र, मुंबई आणि पुणे या रेड झोनमधून प्रवासाचा परवाना घेऊन येणार्‍यांची संख्या वाढली. किणी टोल नाक्यावर वाहनांच्या आणि लोकांच्या प्रचंड रांगा लागल्या. प्रत्येकाची कागदपत्रे तपासण्यासाठी बारा-बारा तास रांगेत तिष्ठत उभे राहावे लागले एवढी गर्दी झाली.

दि. 13 मेपासून दि. 23 मे या दहा दिवसांत 17 हजारांवर लोक कोल्हापुरात आले आहेत. हे सर्वजण रेड झोनमधून आले आहेत. त्याखेरीज रेड झोन नसलेल्या क्षेत्रातून याच काळात सुमारे सात हजारांवर लोक दाखल झाले आहेत. तर त्याहीपूर्वी परवाना घेऊन आणि विनापरवाना प्रवेश केलेल्या; पण प्रशासनाने होम क्‍वारंटाईन केलेल्या लोकांची संख्या 85 हजार आहे. हे लोक अगदी सुरुवातीला आले. या प्रत्येकाशी संपर्क ठेवण्यासाठी एक अ‍ॅप डेव्हलप करण्यात आले. त्यातून हे लोक कोरोनाची लागण होण्याच्या मुदतीतून बाहेर पडेपर्यंत त्यांच्याशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क होता. 

गेल्या दहा दिवसांत जे 17 हजारांवर लोक आले आहेत, त्या प्रत्येकाचा स्वॅब घेण्यात आला आहे. यामध्ये 280 लोक हे कोरोनाबाधित असल्याचे आढळले. दि. 8 मे रोजी कोरोनाची स्थिती कोल्हापूर जिल्ह्यात पूर्ण नियंत्रणात होती. जिल्ह्यात नियंत्रणात असलेली कोरोना रुग्णांची संख्या एक-दोन नव्हे, तर तब्बल 18 पटीहून अधिक फक्‍त 14 दिवसांच्या कालावधीत वाढली आहे. 

पुणे, मुंबई येथील नागरिकांना रेड झोनमधून प्रवासाचा परवाना देताना, त्यांची तपासणी झाली होती काय, असेल तर ही लक्षणे आढळून आली असली तर त्यांना प्रवासाचा परवाना कसा दिला आणि तपासणी केली नसेल तर विनातपासणी त्यांना प्रवासाची परवानगी कशी मिळाली, असे प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.

एकाच भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधितांची संख्या एकवटलेली असेल, तर तो भाग रेड झोनमध्ये समाविष्ट होतो. राज्यात मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबादसह 15 महापालिकांचे क्षेत्र हे रेड झोनमध्ये आहे. ग्रामीण भागात रुग्णांची संख्या आढळली, तरी हे रुग्ण विखुरलेले असतात. त्यामुळे ग्रामीण भाग नॉन रेड झोनमध्ये समाविष्ट होतो. महापालिकेच्या क्षेत्रात मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास ते महापालिका क्षेत्र रेड झोनमध्ये समाविष्ट होऊ शकते, असे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी सांगितले.

कोरोना नियंत्रणासाठी जिल्ह्याच्या सीमा बंदच हव्यात!

कोरोनाचा पहिला रुग्ण चीनमधील ज्या वुहान प्रांतात आढळला तो मोठ्या लोकसंख्येचा भाग आहे. मात्र, रुग्णसंख्या वाढताच चीन सरकारने वुहान प्रांताची पूर्णपणे नाकेबंदी केली आणि सर्वांना आहे तिथेच थांबवून ठेवले. त्यामुळे चीनची राजधानी बीजिंगसह आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या शांघायमध्ये कोरोनाचा प्रवेश झाला नाही, ही खबरदारी चीन सरकारने घेतली. तशी खबरदारी घेऊन जिल्ह्यांच्या सीमा बंद असत्या, तर एवढी रुग्णसंख्या जिल्ह्यात वाढली नसती, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

राज्य सरकारच्या हलगर्जीमुळे जिल्ह्याजिल्ह्यांत वाढले रुग्ण एकाच भागात मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह असल्यास तो भाग रेड झोन : भूषण गगराणी

दि. 9 मेपासून असे आढळले रुग्ण

दि. 9     3

दि. 12    3

दि. 13    3

दि. 14    2

दि. 15    2

दि. 16    7

दि. 17    14

दि. 18    32

दि. 19    53

दि. 20    45

दि. 21    46

दि. 22    31

दि. 23    27